चिपळूण : निवडणुकीतील पराभवानंतर माजी नगरसेवकाचा अनोखा बॅनर चर्चेत – ‘कोणीही देणगी मागायला येऊ नये’ पराभवाची खदखद बॅनरवर

banner 468x60

चिपळूण : निवडणुकीतील पराभवानंतर चिपळुणातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लावलेला अनोखा बॅनर सध्या शहरात आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतःसह पत्नीचाही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, संबंधित माजी नगरसेवकाने आपल्या फर्मबाहेर “कृपया कोणीही देणगी मागायला येऊ नये” असा थेट आशय असलेला बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे, हा बॅनर कोणत्याही कार्यक्रम, सण-उत्सव किंवा राजकीय उपक्रमाच्या निमित्ताने नसून निवडणूक निकालाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी लावण्यात आल्याने त्याची शहरात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, सुमारे ४० ते ४२ वर्षे तन-मन-धनाने जनतेची सेवा केल्यानंतरही मतदारांनी या निवडणुकीत सपशेल नकार दिल्याने संबंधित काँग्रेस नेते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले असावेत. त्यांच्या मनातील नाराजी व खदखद या बॅनरमधून स्पष्टपणे व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे.

“निवडणुकीत साथ दिली नाही, आणि आता देणगी मागायला येता?” असा अप्रत्यक्ष रोख या बॅनरमागे दडलेला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, या बॅनरकडे जाणारे-येणारे नागरिक आवर्जून थांबून वाचत असून, सोशल मीडियावरही या बॅनरची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या राजकीय विश्लेषणात या घटनेमुळे चिपळुणात एक वेगळा आणि नवा ‘राजकीय पॅटर्न’ पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *