लांजा तालुक्यातील साटवली येथील महावितरणच्या उपकेंद्रामध्ये मंगळवारी (२० मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीज कोसळल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेऊन, आज, बुधवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला.
मंगळवारी लांजा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रचंड कडकडाटासह वीज साटवली येथील वीज उपकेंद्रावर कोसळली. यामुळे उपकेंद्रातील उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि उपकेंद्र तात्पुरते बंद पडले.
या घटनेमुळे साटवली उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने तातडीने चांदोर व लांजा येथील उपकेंद्रांमधून पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू केला. तथापि, जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे यात अडथळा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, सापुचेतळे, आगवे, खानवली, साटवली, बेनी बुद्रुक आणि खावडी या गावांचा व परिसराचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता.
उपकेंद्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि उपकरणांची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांनी बुधवारी दिवसभर युद्धपातळीवर अथक काम केले. अखेर, सायंकाळपर्यंत उपकेंद्रातील उपकरणांची देखभाल दुरुस्ती करून साटवली उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*