मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत एका उभ्या असलेल्या ट्रेलरने अचानक रिव्हर्स घेतल्याने एका अल्टो कारला धडक दिली. त्यानंतर हा ट्रेलर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी मनोऱ्याला जाऊन धडकला.
या घटनेमुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक सुमारे १५ मिनिटे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर (क्रमांक एमएच-१४-केआय-७८६९) लांजा बाजारपेठेत फणस स्टॉपजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास चालकाने उभा केला होता.
चालक काही कामासाठी गेला असताना, अचानक हा ट्रेलर आपोआप रिव्हर्स सुरू झाला आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली अल्टो कार (क्रमांक एमएच ०८ आर ७७४०) ला जोरदार धडक दिली. अल्टोला धडक दिल्यानंतरही ट्रेलर थांबला नाही आणि पुढे सरळ जात तो उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उभारलेल्या लोखंडी मनोऱ्याला धडकून थांबला.
रस्त्यावर ट्रेलर आडवा झाल्यामुळे मुंबईच्या दिशेकडील वाहतूक सुमारे १५ मिनिटे पूर्णपणे थांबली होती. ट्रेलर रिव्हर्स येत असल्याचे पाहून अनेक वाहनचालक आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. मात्र, येथील सतर्क नागरिकांनी आरडाओरडा करून रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना आणि वाहनचालकांना सावध केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच ट्रेलर चालक घटनास्थळी परतला. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर ट्रेलर बाजूला करण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. या अपघातात अल्टो कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*