दाभोळ : नीलिमाचा घातपात झाल्याची शंका, संशयास्पद मृत्यूचा तपास करा

banner 468x60

दापोली (Dapoli) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील कंत्राटी कर्मचारी नीलिमा चव्हाण (Neelima Chavan) यांचा मृतदेह दाभोळ खाडीतील उसगाव येथील जेएसडब्लू कंपनीच्या जेटीजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

२९ जुलैपासून त्या बेपत्ता असल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात केली होती. तिच्या डोक्यावरील केस कापले आहेत. नीलिमा यांचा घातपात झाल्याची शंका नाभिक समाज बांधवांनी उपस्थित केली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नीलिमा चव्हाण (वय २४, रा. ओमळी, ता. चिपळूण) ही दापोली येथील एका राष्ट्रीय बँकेत कंत्राटी कर्मचारी होती. शनिवार (ता. २९) जुलैपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मंगळवार (ता. १) सुधाकर चव्हाण यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्यांची मुलगी नीलिमा शनिवारी (ता. २९) जुलैला सकाळी ९ वाजता तिच्या मैत्रिणीला आपल्या ओमळी गावी जात आहोत, असे सांगून घराबाहेर पडली.

ती परतली नाही. तिचा शोध घेऊनही सापडली नसल्याने पालकांनी तक्रार केली होती. नीलिमाचा मृतदेह मंगळवारी (ता. १) ऑगस्टला दुपारी दाभोळ खाडीतील उसगाव येथील जेएसडब्लू कंपनीच्या जेटीजवळ आढळला होता.

नीलिमाचा घातपात झाल्याची शंका नाभिक समाज बांधवांनी उपस्थित केली असून, त्यांनी आज दापोली येथे उपविभागीय पोलिस अधिकारी मुणगेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, नीलिमा २९ जुलैला दापोली येथून खेड येथे बसने गेली होती.

खेड येथील बसस्थानकात ती चिपळूण येथे जाणाऱ्या बसमध्ये शिरत असतानाचेही फुटेज सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तिच्या मोबाईलचे लोकेशन त्याच दिवशी रात्री १२.०५ अंजनी रेल्वे स्टेशन येथे दाखवत होते. नीलिमाचा मृतदेह ज्या वेळी आढळला तेव्हा तिच्या डोक्यावरील केस नष्ट झाल्याचे दिसून आले आहेत.

कोणत्यातरी अनोळखीने पाळत ठेवून तिची हत्या करून तिचा मृतदेह पाण्यात टाकून दिल्याची शंका या निवेदनात व्यक्त केली असून, नीलिमा यांच्या घातपाताचा तपास १२ ऑगस्टपर्यंत न झाल्यास जिल्ह्यातील नाभिक समाज १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ती मैत्रिणीला सांगून दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव लष्करवाडी येथून निघाली होती. शनिवारी दोन दिवस सुटी असेल तेव्हा ती मूळ गावी ओमळी (ता. चिपळूण) जात असे.

इतकेच नव्हेतर २८ जुलैला शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने भाऊ अक्षयला कॉल करून मी सकाळी गावी येणार आहे, असेही कळवले होते. आपला भाऊ अक्षय याच्याजवळ मी उद्या सकाळी घरी येत आहे, हे घरच्यांजवळ झालेले बोलणे दुर्दैवाने अखेरचे ठरले.

ओंबळी (ता. चिपळूण) येथील नाभिक समाजातील हुशार होतकरू तरुणी नीलिमा सुधाकर चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर मंगळवारी (ता. १) तिचा मृतदेह सापडला आहे. तिचा घातपात झाल्याचा नातेवाइकांना संशय आहे.

घटनेचा तपास करून संशयित आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करून दिवंगत नीलिमाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघातर्फे केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *