चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी दत्त मंदिरसमोर चालकाचे एस.टी. बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटीने एका तरुणाला अक्षरश: चिरडले.
यात कोकण रेल्वेमध्ये अभियंता असलेल्या अनिकेत विजय दाभोळकर (३४, रा. खेर्डी बाजारपेठ) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातामुळे खेर्डी व चिपळूण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मंडणगड-धाराशिव ही एसटी बस चिपळूणहून कराडकडे निघाली असता दि. २१ रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास खेर्डीमध्ये हा अपघात घडला. एसटी बस दत्त मंदिरासमोर आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला भरधाव वेगाने गेली.
याचवेळी खेर्डीकडून डाव्या बाजूला मोटारसायकलजवळ थांबलेला अनिकेत विजय दाभोळकर याच्या अंगावरच ही एसटी गेली आणि तो एसटीखाली चिरडला. याचवेळी त्याचे वडील विजय दाभोळकर हे त्याच भाजीच्या दुकानात भाजी घेत होते. आपल्या डोळ्यादेखत मुलाचा दुर्दैवी मृत्यू पाहून तेही कोसळले.
त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अनिकेत याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. बसचालक गोपाळ वाघमारे हे ही बस घेऊन जात असताना अपघात झाला. त्यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समोरून एक महिला रस्ता ओलांडत असताना तिला वाचविण्यामध्ये एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि डाव्या
बाजूला येत ही गाडी भाजीच्या दुकानात घुसली. त्यात तरुणाचा बळी गेला आहे. यानंतर घटनास्थळी खेर्डी परिसरातील नागरिक जमा झाले. यावेळी एसटी चालकाला धारेवर धरण्यात आले. तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने एस. टी. बस पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आली. ‘
भरधाव एसटी बस फळविक्रेत्याच्या शेडमध्ये घुसल्याने त्याचेदेखील नुकसान झाले. सायंकाळी उशिरा खेर्डी एमआयडीसी येथील स्मशानभूमीत अनिकेत दाभोळकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूने दाभोळकर परिवारासह खेर्डीमध्ये शोककळा पसरली. या अपघातात त्याच्या मोपेड गाडीचा चक्काचूर झाला आहे.
पूजेसाठी साहित्य आणायला गेला आणि…
अनिकेत दाभोळकर हा कोकण रेल्वेमध्ये अभियंता म्हणून कामाला होता. बुधवारीच त्याच्या घरामध्ये त्याच्या भावाचा लग्नसोहळा झाला होता. गुरुवारी सकाळी श्री सत्यनारायण पूजा असल्याने वडील आणि तो भाजी व फळे आणण्यासाठी खेड बाजारपेठेत आला होता. अशातच ही दुर्दैवी घटना घडल्याने दाभोळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो सर्पमित्र देखील होता.
भावाच्या विवाहाच्या सत्यनारायणाच्या पूजेला साहित्य आणायला गेलेल्या मोठ्या बंधूचा अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खेडमध्ये शोक व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अतिक्रमणे व पार्किंग
चिपळूण, खर्डी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग तसेच चिपळूण-कराड मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे…
मात्र, संबंधित विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियम पाळले जात आहेत, असे निदर्शनास येत नाही. अनेकांनी गटारावरच टपऱ्या आणि दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या लगत दुकाने उभी झाल्याने अनेकजण रस्त्याच्या कडेला गाड्या लावून भाजी व अन्य साहित्य खरेदीसाठी उभे राहतात. खेर्डीमध्ये तर रस्त्याच्या दुतर्फा गाड्यांचे पार्किंग झाले आहे. यामुळे अनेक अपघात घडले असून अनेकांचे जीवही गेले आहेत.
असे असताना देखील पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि परिवहन विभाग या समस्येकडे लक्ष देताना दिसून येत नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













