चिपळुण : गांजाविरोधात पोलिसांची धडक मोहीम सुरू

banner 468x60

चिपळूण शहरासह तालुक्यात गांजाने उच्छाद मांडला असून पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. चिपळूण पोलिसांच्यावतीने आता टपरी – टपरीची झडती घेतली जात आहे.

शहर परिसरातील टपरीवर गांजा राजरोस विकला जातो अशी टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहीम उघडली आहे. शहर परिसरातील सर्व ठिकाणे दिवस-रात्र गस्त घालून तपासण्यात येत आहेत.

banner 728x90

या शिवाय आत्तापर्यंत मुंबई-गोवा महामार्ग तसेच शहर परिसरातील दीडशेहून अधिक टपऱ्यांची तपासणी चिपळूण पोलिसांनी केली आहे. या कारवाईत तब्बल पंधराजणांना ताब्यात घेऊन पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील विरेश्वर तलावानजिक असणाऱ्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर चार तरूणांचे टोळके गांजा ओढताना रंगेहात सापडले.

जमावाने या तरूणांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर गांजा पुरवठा करणाऱ्या बॉडीबिल्डरचे नाव पुढे आहे. बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये अनेक पुरस्कार मिळालेला आणि सध्या जिम चालविणारा अमर लटके या बॉडीबिल्डरला पोलिसांनी दोनवेळा अटक करून कारवाई केली.

यानंतर शहरात गेले आठ दिवस धाडसत्र चालविण्यात येत आहे. गांजा व अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चिपळुणातील नागरिक एकवटले असून पोलिसांवरील दबाव वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर येथील पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम आखण्यात आली आहे. मुंबई – गोवा महामार्गासह शहर बाजारपेठ, गांधारेश्वर रोड आदी भागात पोलिस प्रत्येक टपरीवर भेट देऊन या टपऱ्यांची तपासणी करीत आहेत.

दिवसभर ही मोहीम आखली जात असून गांजावर कडक कारवाई करण्यासाठी एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे तर आजपासून आणखी एक अधिकारी व चार कर्मचारी नेमण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितले.

शहर परिसरातील गांधारेश्वर, मुरादपूर रोड, एन्रॉन पूल, रेल्वे पूल, विरेश्वर तलाव, भोगाळे कलावती आई मंदिर, बहादूरशेख पूल, गुहागर बायपास रोड, लवेकर बाग, रामतीर्थ तलाव, डीबीजे महाविद्यालय परिसर, खेर्डी एमआयडीसी आदी भागात पोलिसांनी दिवस-रात्र गस्त सुरू केली आहे. या ठिकाणी विशेष पथकाद्वारे मोहीम राबविण्यात येत असून गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *