हर्णै : मासेमारी थांबल्याने करोडोंचं नुकसान

banner 468x60

अचानक बदललेल्या वातावरणामुळे हर्णै बंदरातील (Harnai Port) मासेमारी उद्योगाला ब्रेक लागला आहे. बंदर गजबजायला अजून एक आठवडा जाण्याची शक्यता आहे. किमान तीन आठवडे मासेमारी बंद असल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.

शासनाच्या नियमानुसार, १ ऑगस्टपासून चालू झालेल्या मासेमारी उद्योगाची सुरवात चांगली झाली होती. बंपर मासळी मिळू लागली होती. परंतु बहुतांशी मासळीचे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ५० टक्क्यांनी दर घसरले होते.

banner 728x90

तरीही किमान ३०० ते ४०० नौका मासेमारीला (Fish Market) उतरल्या होत्या. १ ऑगस्टपासून सुरू झालेली मासेमारी १८ ऑगस्टपर्यंत सुरू होती. त्यानंतर गणेशोत्सवामुळे मासेमारीला लागलेला ब्रेक कायम आहे.

अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीला सुरवात होणार होती; परंतू हवामानखात्याचा हायअलर्ट आल्यावर पुन्हा मच्छीमार थांबले. २९ पासून जोरदार पाऊस व वादळीवारे सुरू झाल्याने मासेमारी ठप्प झाली.

अजूनही वातावरण ढगाळ आहे. वातावरण शांत झाल्याशिवाय मासेमारीला नौका जाणार नाहीत. अजूनही चार ते पाच दिवस मच्छीमारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती पाजपंढरी येथील श्रीराम मच्छीमार सोसायटीचे संचालक व मच्छीमार हेमंत चोगले यांनी दिली.

मासेमारी बंद असल्याने येथील बंदरात मासळी विक्रीतून होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे. गणेशोत्सवासाठी खलाशी सुट्टी घेतात; परंतु उत्सव संपल्यावर मासेमारी लगेचच सुरू होणार होती. अचानक आलेल्या वादळाने मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे.

२९ ते ३० तारखेला मच्छीमार मासेमारीला गेले असते तर आज बंदर मासळीच्या लिलावाने गजबजायला सुरवात झाली असती. वादळामुळे थांबलेली मासेमारी चालू होण्यासाठी अजूनही तीन ते चार दिवस लागतील.

त्यामुळे पुढील आठवडाभर होणारी करोडोंची उलाढाल ठप्प होणार आहे. या आठवड्याभरात किमान १० ते १२ कोटींचा फटका या व्यवसायाला बसला आहे. बंदरात अजूनही शुकशुकाट आहे.

अजूनही बरेचसे नौकामालक नौकांची डागडुजीची कामे करत आहेत. वादळाच्या धोक्यामुळे नौका सर्व आंजर्ले खाडीतच नांगर टाकून उभ्या आहेत. वातावरण चांगले होण्याची वाट मच्छीमार बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *