उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत (Kiran Samant) यांनी माघार, अशी पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) केली असून सध्या संपूर्ण मतदारसंघात ही पोस्ट व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी निर्णय घेतल्याचं किरण सामंत यांनी सांगितलं आहे. ट्विटरवरुन ट्वीट करत किरण सामंत यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, संपूर्ण कोकणात ही पोस्ट रात्रीपासून व्हायरल झाली आहे,
मात्र या पोस्टसंदर्भातील पुष्टी अजून व्हायची आहे. किरण सामंत यांनी केलेली माघार घेतल्याची पोस्ट आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची पत्रकार परिषद यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीतील तिढा या कुठेतरी पूर्णविराम लागला आहे, असं म्हणता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी किरण सामंत यांनी स्वतः त्यांच्या मोबाईलवरुन व्हॉट्सअॅपवर त्यांच्या ट्विटरवरच्या पोस्टची लिंक काही ग्रुपवर शेअर केली आहे.
त्यांनी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की, त्यानंतर क्षणार्धातच त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊल समर्थकांकडून पाडला जायचा. पण किरण सामंतांनी माघार घेतल्याबाबत जी पोस्ट केली, त्या पोस्टवर कोणीही रिअॅक्ट झालेलं नाही.
त्यामुळे किरण सामंतांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंत यांचा मोठा दबदबा. साधारणतः वर्षभरापासून किरण सामंत यांनाच आगामी लोकसभेसाठी उमेदवारी मिळेल, याच अपेक्षेनं सर्व समर्थक काम करत होते.
या सर्व समर्थकांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी केलेल्या पोस्टवर कोणीही व्यक्त होत नाही. यातूनच येत्या काळात महायुतीतील धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. अजुनही अनेक कार्यकर्त्यांची अशीच अपेक्षा आहे की, किरण सामंत यांनाच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होईल.
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर रत्नागिरी सिंधुदुर्गातून किरण सामंतच निवडणूक लढवतील, अशी अजुनही अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नारायण राणे यांनी काल (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत किरण सामंत यांना विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे अगदी आक्रमकपणे व्यक्त झाले.
विशेषतः काल (मंगळवारी) रत्नागिरीत एक कार्यकर्ता मेळावा पार पडला. यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे अनुपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे, आज नारायण राणे स्वतः कुडाळमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत आहेत.
त्यामुळे कुठेतरी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत की, लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नारायण राणेंनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असून आजचा मेळावा हा त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आहे.
याच वातावरतणात किरण सामंत यांची पोस्ट कोकणातील राजकारण भविष्यात कोणत्या दिशेनं जाणार याकडे लक्ष वेधणारी आहे. दरम्यान, अद्याप किरण सामंत यांनी अधिकृतपणे यासंदर्भात किंवा सोशल मीडिया पोस्टबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*