लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या काळात मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही काम करण्यात येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विविध कामांना आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे.
तसेच विविध कार्यालयात होण्यासारख्या कामांनाही आचारसंहितेचे कारण सांगून नागरिकांची अडवणूक केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सहकार विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, यासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कामानिमित्त नागरिक येत असतात.
मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आलेल्या नागरिकांच्या कामांची विचारपूस न करता त्याला आचारसंहितेचे कारण सांगून परत पाठवले जात आहे. त्यामुळे शासकीय निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची कामे होईनाशी झाली आहेत.
त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निवडणूक आचारसंहितेचा व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीचा काय संबंध? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या व अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीची कामे करताना दिसत आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांवरच मार्च एडिंगची कामे सुरू आहेत. या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातून विविध कामे घेऊन काही पदाधिकारी शासकीय कार्यालयात येत आहेत. मात्र, अधिकारी आचारसंहितेची अडचण पुढे करत आहेत.
त्यामुळे कामानिमित्त आलेल्या पदाधिकाऱ्यांना काम न होताच माघारी फिरावे लागत आहे. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका निवडणूक कामासाठी केल्या आहेत.
मात्र, उर्वरित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात असूनही ते वेळेत उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अनेक कार्यालयीन कामे खोळंबली जात आहेत. याचा सर्वसामान्यांना फटका बसत असून, अशा कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामानिमित्त येणाच्या नागरिकांमधून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















