गतवर्षी कमी कालावधीत पडलेला पाऊस व सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे.
राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील इंग्रजकालीन साहेबाच्या धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. परिणामी, राजापूरवासीयांवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईचे संकट ओढवण्याचे चित्र आहे. पावसाळ्यात पाणीच पाणी मात्र उन्हाळ्यात पाणीबाणी अशी राजापूरची दरवर्षी अवस्था असते.
राजापूर शहरातून कोदवली व अर्जुना या दोन नद्या वाहत असल्या तरी दरवर्षी राजापूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी राजापूर नगर परिषदेला टंचाई काळात शीळ जॅकवेलवरून पाणी पंपाद्वारे खेचावे लागते.
त्यातच वीज सातत्याने खंडित होत असल्याने शीळ जॅकवेलवरून पाणी खेचण्यात नगर परिषदेली अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी शीळ जॅकवेलवर जनरेटर बसवावा लागतो. या जनरेटरच्या भाड्यापोटी दरवर्षी लाखो रुपयेही खर्च करावे लागतात, मात्र तरीही पाणीटंचाईचे संकट कायम राहते.
सध्या ‘क’ वर्गात असणाऱ्या राजापूर नगर परिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात; पण पाणीपट्टीच्या करातून राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे सायबाच्या धरणातील पाणीसाठा संपला की शहरवासियांना पाणीपुरवठा करताना राजापूर नगर परिषदेच्या नाकीनऊ येतात.
इंग्रजकालीन सायबाच्या धरणाच्या खालच्या बाजूला राजापूर नगर परिषदेने आजपर्यंत १० कोटी ७० लाख रुपये खर्च करून नवीन धरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, निधी कमी पडल्याने सदर नवीन धरण अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. हे नवीन धरण पूर्ण करण्यासाठी अजून ८ कोटी रुपयांची गरज असल्याचे नगर परिषद प्रशासनाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आता सायबाच्या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत असल्याने यावर्षी राजापूरकरांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
सायबाच्या धरणावर अनेक वर्षे अवलंबून
या नवीन धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने या धरणात पाणीसाठा होत नसून सद्यस्थितीत राजापूर नगर परिषदेला जुन्या इंग्रजकालीन साहेबाच्या घरणावरच पाणी पुरवठ्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*