लांजा : मुसळधार पावसामुळे रस्ता खचला

banner 468x60

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यातील लांजा – खोरनिनको मार्गावरील लक्ष्मी मंदिर ते चौगुले दुकान दरम्यान मोठ्या वहाळावर असलेली मोरी खचली असून भलेमोठे भगदाड पडले आहे.

त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना शुक्रवारी २८ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील लांजा – प्रभानवल्ली या मार्गावर लक्ष्मी मंदिर ते चौगुले दुकान या दरम्यान असलेली वहाळावरील मोरी ही मे महिन्यातच खचली होती.

मात्र बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत या मोरीच्या वरच्या बाजूस असलेली मोरीचे नव्याने बांधकाम केले होते. खचलेल्या मोरीच्या बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नव्हती. गेले दिवस पडलेल्या तुफानी पावसाचा फटका खोरनिनको रस्त्याला बसला असून या ठिकाणची मोरी ही खचली असून रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे.

त्यामुळे या मार्गावरील एस.टी. बससह अन्य खासगी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे. केवळ दुचाकी सारखीच वाहने या ठिकाणी जाऊ शकतात इतकी बिकट अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मे महिन्यातच याबाबत कार्यवाही करून या ठिकाणी नवीन मोरीचे बांधकाम केले असते तर आजची ही परिस्थिती उद्भवली नसती असे येथील स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच आजची ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गाची देखील मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *