kokan Loksabha Election : कोकणात भाजपकडून मित्रपक्षांची कोंडी; शिंदे गटाकडूनही जोरदार फिल्डिंग

banner 468x60

कोकणात मित्रपक्षांची कोंडी करण्याचे धोरण भाजपने (BJP) स्वीकारले आहे. रायगडपाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे.

त्यामुळे रायगडमधून राष्ट्रवादीची, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यातील इतरभागांच्या तुलनेत कोकणात भाजपची ताकद कमी आहे.

रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघातल पेण हा एकच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नितेश राणे हे भाजपचे एकमेव आमदार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी आहे,

मात्र तरीही दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितल्याने रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आता भाजपने दावा सांगितला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे निर्देश दिले आहेत. राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही, मात्र पक्षाचा आदेश आला तर सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची चिन्ह दिसत आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने तो शिंदे गटाला मिळावा, अशी अपेक्षा पक्षपदाधिकाऱ्यांची होती.

उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तशी मोर्चेबांधणी त्यांनी सुरू केली आहे, मात्र नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसतेे.

त्यामुळे हा मतदारसंघ मित्रपक्षाला देण्याची भाजपची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत, तरीही भाजपने शेकापमधून आलेल्या धैर्यशील पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेऊन निवडणूक तयारीही सुरू केली आहे. या मेळाव्यामधून भाजपकडून सुनील तटकरे यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असावा, सुनील तटकरे यांना उमेदवारी नकोच असा सूर भाजपने लावण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी कोंडी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. मित्र पक्षातील फूट, बदललेली राजकीय परिस्थिती यावर बोट ठेवून भाजपने कोकणातील दोन्ही मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरवात केली आहे. यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोन्ही मित्र पक्ष दुखावले जाण्याची शक्यता आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *