दापोली : परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला दिली 15 ऑक्टोबर पर्यंतची मुदत

banner 468x60

निवेदिता प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषद दापोली यांच्या वतीने समस्त नागरिकांच्या समवेत तहसीलदार कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी दापोली परिसरातील दापोली एसटी स्टँड, दापोली खोंडा परिसर ,दापोली जालगाव मार्ग त्याचप्रमाणे वणौशी ते दाभोळ मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी करणारे निवेदन दापोली तहसीलदार, नगराध्यक्ष दापोली,सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली, उपविभागीय अधिकारी दापोली आणि पोलीस निरीक्षक दापोली यांना दिले आहे.


दापोलीतील संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन अनेक मंडळी जायबंदी झाली आहेत. हे खड्डे तातडीने बुजवावेत याकरता निवेदिता प्रतिष्ठान मराठी पत्रकार परिषद दापोली यांच्या पुढाकारांने तालुका प्रशासनाला 15 ऑक्टोबर पर्यंत सिमेंट ग्रीड खडी या पद्धतीचे काँक्रिटीकरण पद्धतीने खड्डे बुजवून खड्डेमय परिसरातील पूर्ण पॅच हा दुरुस्त करावा व अल्पावधीतच संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी केली आहे.


या मागणी समवेतच पंधरा तारखेपर्यंत खड्डे मुक्त रस्ता न झाल्यास 25 ऑक्टोबर रोजी तमाम संतप्त त्रस्त नागरिकांच्या तर्फे ठिय्या आंदोलन सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये करण्यात येईल असा अंतिम इशाराही या निवेदनानुसार देण्यात आला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटना दापोली, पेन्शनर असोसिएशन दापोली, जैन संघटना दापोली, जालगाव व्यापारी संघटना, दिव्यांग शाळेचे संचालक, निवेदिता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पत्रकार परिषदेचे पत्रकार या सर्वांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार दापोली यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवण्यासंदर्भात संबंधित खात्याला सुचित करते असे आश्वासित केले आहे. ममता मोरे नगराध्यक्ष दापोली आणि ऋषी गुजर यांनी याप्रसंगी नगरपंचायतीच्या वतीने आम्ही तुमच्या सोबत असून नगरपंचायत प्रशासन ढिम्म असल्याची खंत व्यक्त करून खड्डे न बुजल्यास नगराध्यक्षांसह नगरसेवकही आंदोलनात सहभाग घेतील असे सांगून या आंदोलनाला प्रशासनाच्या विरोधात आणि त्रस्त नागरिकांच्या बाजूने पाठिंबा व्यक्त केला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *