दाभोळ : कोलथरे हत्याखांडातील संशयिताला पकडण्यात दाभोळ पोलिसांना यश

दाभोळ पोलीस टीम

banner 468x60

तालुक्यातील कोळथरे येथील विशाल मयेकर खून प्रकरणातील संशयित शशिभूषण शांताराम सनकुळकर (४७, रा. कोळथरे) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गेले तीन दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता.

अखेर गावातील एका शेतात लपून बसलेल्या शशिभूषणला सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु तपासकाम सुरु असल्याचे कारण देत दाभोळ पोलिसांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

दारु पिताना मित्रा-मित्रांमध्ये वाद होऊन विशाल शशिकांत मयेकर (३९, रा. पंचनदी-निमुर्डेवाडी) याचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. गावात चौकशी केली असता मयत विशाल मयेकर, संशयित शशिभूषण सनकुलकर व मनोज आरेकर यांची चांगली मैत्री असल्याचे समजले.

हे तिघेही जणगावामध्ये आंबे काढणे, नारळ काढणे अशी कामे करत असत.घटना घडली त्यादिवशी रात्री तिघेही मनोज आरेकर याच्या कोळथरे खालचा भंडारवाडा येथे एकत्र दारु प्यायला बसले होते.

तिथे त्यांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद विकोपला गेला. यावेळी शशिभूषण याने स्वतःजवळील कोयता विशाल मयेकर याच्या डोक्यात मारला. वार केल्यानंतर शशिभूषण हा लागलीच तेथून पसार झाला होता.

दरम्यान कोयत्याचा वार वर्मी लागून विशाल मयेकर रक्तबंबाळ झाला होता. त्याच अवस्थेत त्याने चालत मदतीसाठी ग्रामस्थांना बोलवण्याचा प्रयत्न केला. जवळपास अडीचशे ते तिनशे तो फूट चालत गेला.

मात्र तोपर्यंत अतिरक्तस्त्राव झाला होता. तो खालचा भांडारवाडाच्या लगत असणाऱ्या कोळथरे मोहल्ला येथे आला असता रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि तेथेच गतप्राण झाला.शशिभूषण सनकुळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती गावात चौकशी केली असता समजली. पोलिसांनीदेखील त्याला दुजोरा दिला आहे.

त्याला यापूर्वी एका गुन्ह्यात त्याला तुरुंगाची हवा खायला लागली होती. शिवाय एका प्रकरणात त्याला हद्दपार देखील करण्यात आले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शशिभूषणवर कायमस्वरुपी कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

हा खून झाल्यानंतर यातील संशयित सनकुळकर तात्काळ पसार झाला. त्याचा माग काढण्याकरिता पोलिसांच्या डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाला तेथे पडलेल्या चपलेचा वास दिल्यानंतर तो प्रथम घटनास्थळीच घुटमळला. यानंतर त्याने गावातील दर्यापर्यंतचा माग काढला. मात्र त्याच्यापुढे श्वान तपास करू शकला नाही.


खुनाचा प्रकार घडला ते ठिकाण आणि विशाल मयेकर जेथे मृतावस्थेत सापडून आला ते ठिकाण यामध्ये थोडे अंतर आहे. वास्तविक पाहता हा गुन्हा कोळथरे खालचा भंडारवाडा येथे घडलेला असताना पोलिसांच्या तक्रारीत मयत विशाल मयेकर जेथे पडला होत्या त्या मोहल्ल्याचे तांत्रिकदृष्ट्या नाव आल्याने मोहल्ल्यातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

घटनास्थळी मिळालेले रक्त व विशाल मयेकर सापडून आला तेथील रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. दोन्ही नमुने एकाच व्यक्तीच्या रक्ताचे आहेत का याचा पोलीस तपास करणार आहेत.


मुख्य संशयित आरोपी असणारा शशिभूषण सनकुळकरच्या याच्या घराची दाभोळ सागरी पोलिसांकडून कसून झडती घेण्यात आली. त्याने खून करण्यासाठी वापरलेले हत्यार त्याच्या घरात सापडते का याचा पोलिसांनी कसून तपास घेतला.

मात्र पोलिसांना त्याच्या घरात खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार सापडून आले नाही. तसेच पोलिसांना ज्या वस्तू संशयास्पद वाटल्या त्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याचे समजते.

ही कारवाई अमोल गोरे सहा. पोलीस निरीक्षक दाभोळ गणेश कदवाडकर सहा. फौ दाभोळ, राजू मोहिते दापोली पोलीस ठाणे, राजेंद्र नलावडे दापोली पोलीस ठाणे, निलेश खोपडकर दाभोळ पोलीस ठाणे, सागर कांबळे पोना दाभोळ पोलीस ठाणे, भावेश रोहिलकर पोशी दाभोळ पो ठाणे, विशाल किर्वे पोशी दाभोळ पोलीस ठाणे यांनी केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *