मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटाच्या (Parashuram Ghat) पायथ्याला फरशीतिठा येथे भुयारी मार्गासाठी भराव केल्याने सातत्याने वाहतूककोंडी होत होती;
मात्र आता भुयारी मार्गावरून चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू झाल्याने येथील वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली आहे. मात्र, नव्या मार्गावर एसटी बसथांबा उपलब्ध नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम तापदायक ठरले. सतत दरडी कोसळण्याचा घटना व रस्त्यावर माती आल्याने बऱ्याचदा हे काम थांबवावे लागले होते. काम सुरू असताना अपघातही घडले.
मात्र, आता या सर्व अडचणींवर मात करत परशुराम घाटातील बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे. दोन्ही मार्गावरील काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आता डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.
परशुराम घाटातील अतिशय धोकादायक टप्प्याच्या ठिकाणी हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याशिवाय घाटात मध्यवर्ती ठिकाणी काँक्रिटीकरणाचा काही भाग खचल्याने तो ब्रेकरने तोडून दुरुस्ती केली जात आहे. या कामावर लक्ष केंद्रित केल्यानंतर फरशीतिठा येथील भुयारी मार्गाच्या कामाकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात येथील भरावाची माती रस्त्यावर आल्याने अनेक वाहने चिखलात अडकून पडली होती. मात्र, पावसाचा जोर कमी होताच चिखल हटवून तेथे खडी टाकली होती. या प्रकारानंतर तातडीने फरशीतिठा येथे भुयारी मार्गावरून जाणारा चौपदरीकरणातील एक मार्ग सुरू करण्यात आला.
त्यामुळे फरशीतिठा येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात आली आहे. फरशी तिठा येथून डीबीजे महाविद्यालय, एसपीएम हायस्कूलचे विद्यार्थी तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगार नियमित बसने प्रवास करतात;
परंतु भुयारी मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भराव करून रस्ता उंच केल्याने वाहने वरच्यावर निघून जात आहेत. परिणामी, बसथांबा नसल्याने विद्यार्थ्यांसह कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी चौपदरीकरणाच्या मार्गावर बसथांबा सुरू करण्याची व तेथे पायऱ्या उभारण्याची मागणी केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













