चिपळूण : वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

banner 468x60

दोन दिवसांपुर्वी पंढरपूरची वारी करून आलेल्या वयोवृद्ध महिलेचा जमिन वादातून खून केल्याची घटनेने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरानजिकच्या वालोपे येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्यात आले. पुतण्यानेच चुलतीचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र संबंधीत पुतण्या हा घटनेनंतर पसार झाला असून त्याची पत्नी व दोन मुलांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळावरून छेऱ्याची बंदूक, हातोडा, पक्कड, असे साहित्य व अर्धवट जळलेली महिलेची साडी पोलिसांनी जप्त केली आहे.


लक्ष्मी अनंत हर्चिलकर (७०, वालोपे वरचीवाडी) असे खून झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. वारकरी असलेल्या लक्ष्मी हर्चिलकर या दोन दिवसांपुर्वीच पंढरपूरची वारी करून घरी आल्या होत्या.

त्याचदिवशी त्यांच्या घरी पुतण्यांसोबत जमिनीच्या कारणावरून वाद झाला. मात्र शुक्रवारी सकाळी ८ वाजता लक्ष्मी हरर्चिलकर या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. परंतू दुपारी दोन वाजले तरी त्या घरी न आल्याने त्यांचा लहान मुलगा विनोद अनंत हर्चिलकर व त्याचे चुलत भावडांनी शेतात जाऊन पाहिले असता तेथे कोणीही दिसून आले नाही.

मात्र त्याचवेळी शेजारी असलेल्या सामुहिक शेतीतील प्रकाश गणपत हर्चिलकर याच्या जागेत काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी पाहणी केली असता लक्ष्मी हर्चिलकर यांनी परिधान केलेल्या साडीचा काही भाग तेथे दिसून आला. तसेच काही अवयवही अर्धवट स्थितीत जळलेले दिसून आले.

त्यामुळे त्यांना लक्ष्मी हर्चिलकर यांचा खून झाल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ गावचे पोलिस पाटील भालचंद्र कदम व सरपंच अनिषा काजवे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्याठिकाणी अर्धवट जळलेले अवशेष दिसून आले. तेथे धारदार खिळाही सापडला. त्यानंतर शेतघरात तपासणी केली असता छेऱ्याची बंदूक, हातोडा, पक्कड सारखे साहित्य आढळले. तसेच तेथून काही अंतरावर लक्ष्मी हर्चिलकर यांच्या शेतात पोलिसांना रक्त सांडलेले दिसून आले.

तेथून त्यांचा मृतदेह ओढत आणून जाळला असावा, असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मी हर्चिलकर यांच्या पश्चात दोन विवाहीत मुलगे, तीन विवाहीत मुली असा परिवार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *