चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची साठमारी सुरु झाली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडून तसेच महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून इच्छुक पुढे येत आहेत.
त्यामुळे या जागेसाठी पक्षनिश्चिती आणि उमेदवाराची निवड या दोन्ही गोष्टी राजकीय पक्षांसाठी डोकेदुखीच्या होणार आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता चढाओढ लागली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम आणि शिवसेनेचे सदानंद चव्हाण २०२४ च्या निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत.
त्याचवेळी महाविकास आघाडीकडून नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) गेलेले प्रशांत यादव, ठाकरे शिवसेनेकडून भास्कर जाधव आणि रोहन बने इच्छुक आहेत. दरम्यान, प्रशांत यादव राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली असून, ही जागा काँग्रेस लढवेल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीरही केले आहे.
शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी दमदार विजय मिळवला. अनेक वर्षानंतर हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणला. त्यामुळे येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले होते.
परंतु राज्यातील बदलत्या समीकरणांमुळे राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आमदार शेखर निकम हेही त्यांच्या सोबत गेले. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादीत फूट पडली.
माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेत पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली. त्यांनी अनेक नवीन चेहऱ्यांना पदे देऊन नव्या दमाने सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीत चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. आता शेखर निकम महायुतीमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढवणार, हा प्रश्न होता.
येथे उमेदवार नसल्याने हा मतदार संघ ठाकरे गटाला देऊन त्या बदल्यात जिल्ह्यातील एखादा मतदारसंघ शरद पावर आपल्याकडे घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
विशेष म्हणजे ठाकरे शिवसेनेही या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी या मतदार संघात आपण इच्छुक असल्याचे जाहीर करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.
त्याचवेळी माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनीही तयारी सुरू केली होती. त्यामुळे हा मतदार संघ ठाकरे शिवसेनेकडे जाणार असे स्पष्ट चित्र दिसू लागले होते.
आता प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आणि ते उमेदवार असतील असे त्यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळीच जाहीर झाल्याने महाविआस आघाडीकडून या मतदार संघात निवडणूक कोण लढवणार, हा प्रश्नच आहे.
महायुतीकडून कोण
ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली तेव्हा चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत नव्हता.
त्यामुळे चिपळूणची जागा सदानंद चव्हाण यांना मिळेल, असे अपेक्षित धरले जात होते. मात्र नंतरच्या घडामाेडींमध्ये विद्यमान आमदार शेखर निकम महायुतीत सामील झाल्यामुळे महायुतीकडून येथे निकम की चव्हाण असा प्रश्न आहे.
काँग्रेसनेही बांधले बाशिंग
काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस दुखावली गेली आहे. आता आम्हीही येथे उमेदवार उभा करणार, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना ही निवडणूक लढवायची असल्याचे स्पष्ट होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













