Chiplun Konkan Politics: चिपळूणची जागा कोणाला मिळणार?

banner 468x60

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची गर्दी सुरू झाली आहे. शिवसेनेत फूट पडली तेव्हा चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.


त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत नव्हता. त्यामुळे चिपळूणची जागा सदानंद चव्हाण यांना मिळेल, असे अपेक्षित धरले जात होते. मात्र नंतरच्या घडामोडींमध्ये विद्यमान आमदार शेखर निकम महायुतीत सामील झाल्यामुळे महायुतीकडून येथे निकम की चव्हाण असा प्रश्न आहे.

महायुतीकडून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडून तसेच महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून इच्छुक पुढे येत आहेत. त्यामुळें या जागेसाठी पक्षनिश्चिती आणि उमेदवाराची निवड या दोन्ही गोष्टी राजकीय पक्षांसाठी डोकेदुखीच्या होणार आहेत.

बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम आणि शिवसेनेचे सदानंद चव्हाण २०२४ च्या निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत.

त्याचवेळी नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) गेलेले प्रशांत यादव, ठाकरे शिवसेनेकडून भास्कर जाधव आणि रोहन बने इच्छुक आहेत. दरम्यान, प्रशांत यादव राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली असून, ही जागा काँग्रेस लढवेल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीरही केले आहे.

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी दमदार विजय मिळवला. त्यामुळे येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले होते. परंतु राज्यातील बदलत्या समीकरणांमुळे राष्ट्रवादीत फूट पडली.

अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आमदार शेखर निकम हेही त्यांच्या सोबत गेले. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादीत फूट पडली.

माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेत पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली. त्यांनी अनेक नवीन चेहऱ्यांना पदे देऊन नव्या दमाने सुरुवात केली आहे. प्रशांत यादव राष्ट्रवादीत गेल्यानंतर कॉंग्रेस संपली असे नाही. आम्ही नव्याने काँग्रेसला उभारी देवू. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नाही तर कॉंग्रेस चिपळूणची जागा लढवेल.
–लियाकत शाह शहरप्रमुख, काँग्रेस चिपळूण

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *