खेड : सत्याचा विजय, सचिन घाटगे कुटुंबाला अखेर न्याय, हायकोर्टाचा खेड पोलिसांना दणका, खेड पोलिसांनी चूक सुधारली, आईचा न्यायालयीन लढा यशस्वी

banner 468x60

सत्याच्या न्यायाला थोडी प्रतीक्षा करावी लागते मात्र अखेर सत्याचा विजय होतोच याचा प्रत्यय खेडमध्ये आलेला आहे. सचिन घाटगे कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे.

banner 728x90

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास करताना मृत तरुणालाच आरोपी बनवणार्‍या पोलिसांना उच्च न्यायालयाने दणका दिला.

चुकीच्या तपासावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी चूक सुधारली आणि आरोपपत्रातील दुचाकीस्वार तरुणाचे नाव वगळले. मुलाला मृत्यूनंतर आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या पोलिसांविरुद्ध तरुणाच्या आईने उच्च न्यायालयापर्यंत लढा देत आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून दिला.

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावाजवळ १२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री दुचाकी व ट्रकमध्ये अपघात झाला होता. या अपघातात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार सचिन घाटगे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास करणार्‍या पोलिसांनी सचिनला जबाबदार ठरवले आणि गुन्हा दाखल केला.

मृत सचिनला आरोपी बनवण्याच्या पोलिसांच्या कारभाराविरुद्ध सचिनची आई आशा घाटगे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांना मृत सचिनचे नाव आरोपपत्रातून वगळण्यास भाग पाडले आणि याचिका निकाली काढली.


न्यायालयाच्या आदेशानुसार खेड पोलिसांनी अपघाताचा फेरतपास करून दुसर्‍यांदा आरोपपत्र दाखल केले. मात्र त्यातही ट्रकचालक राजन चौहानसोबत दुचाकीस्वार सचिनचे आरोपी म्हणून नाव ठेवले होते. पोलिसांचा हा गलथान कारभार ऍड. रेश्मा मुथा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणला.

त्यांचा युक्तिवाद खंडपीठाने ग्राह्य धरला आणि मृत व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र कसे काय दाखल केले? असा संतप्त सवाल करीत पोलिसांचे कान उपटले. त्यानंतर मृत सचिनचे नाव वगळून पोलिसांनी तिसरे आरोपपत्र दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *