खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना गरम मातीच्या संपर्कामुळे भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीतील एच.आर. मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, मालक आणि व्यवस्थापक अशा चौघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव शकुंतला बबन सोनवणे (वय ४८) असे आहे. ही घटना दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्या वेळी शकुंतला सोनवणे या कंपनीच्या आवारात पडलेले भंगार गोळा करत असताना गरम मातीमुळे त्यांच्या साडीला व हाताला भाजल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ललिता चंद्रकांत सोनवणे (सध्या रा. चिपळूण, मूळ रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची चुलत सासू शकुंतला सोनवणे या पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी परिसरातील गरम मातीमुळे अपघात होण्याची शक्यता असूनही संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही, तसेच निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पुष्कर कंपनीचे सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एच.आर. मॅनेजर सचिव बाळकृष्ण मनवळ (वय ४३, रा. भरणे बाईतवाडी, खेड), रविंद्रकुमार सवरमल भुतिया (वय ५३, रा. बांदल हायस्कूल परिसर, चिपळूण), मालक गौतम मखरिया तसेच व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













