खेड : लोटे एमआयडीसीतील स्फोटातील जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

banner 468x60

खेड लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रियल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या ११ कामगारांपैकी रघुनाथ खंडू खामकर (वय ५७, रा. मुरडे शिंदेवाडी, ता. खेड) यांचा मंगळवारी पहाटे नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

banner 728x90 banner 728x90

ही दुर्घटना दि. ६ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता घडली होती. या स्फोटात एकूण ११ कामगार गंभीररीत्या भाजले होते. त्यापैकी नंदकिशोर राणे (४५, दाभिल खोतवाडी), रणजित सुभाष राणे (४०, दाभिल खोतवाडी), सुजन गोपाळ दास (२९, सुपरवायझर, रा. आवाशी माळवाडी), निखिल रवींद्र मोरे (३४, शिरळ मोरेवाडी, ता. चिपळूण) तसेच फिर्यादी शिवानंद बाबुराव खोंडे (३२, रा. लोटे धापसेवाडी, मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर) या जखमी कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच असद इमाममुद्दीन खान (४४, पटवर्धन लोटे), अरमान जुनेद शाह (२९, विक्रमगंज, पटणा, बिहार), समीर इनायतुला शेख (२२, अहमदपूर, जि. लातूर) यांना परशुराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर महंमद इलियास मुरूम मुश्ताक शेख (२७, पटणा, बिहार), परवेझ सादिक शेख (२२, अहमदपूर, लातूर) आणि मृत रघुनाथ खंडू खामकर यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान खामकर यांचा मृत्यू झाला.

स्फोटानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. औद्योगिक वसाहतीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांनीही कंपनीत पाहणी केली आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


दरम्यान, या घटनेपूर्वी कंपनीत झालेल्या सुरक्षा तपासणीत नेमकी कोणती बाब तपासण्यात आली होती, असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *