खेड : दारू पिणाऱ्या एसटी बसचालक तीन महिन्यांसाठी निलंबित

banner 468x60

खेड तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी दि.२३ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सवणस गावानजीक खेड-पन्हाळजे बस व दुचाकी अपघात झाला असता, चालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी चालक, वाहकास धारेवर धरले.

चौकशीअंती एसटी चालकावर तीन महिन्यांसाठी निलंबन कारवाई करण्यात आली असल्याची माहिती खेड आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली आहे. या चालकाची भांडाफोड कोकण कट्टा न्यूजने केल्यानंतर अखेर त्या चालकाचा तीन महिन्यांसाठी निलंबित झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तालुक्यात याबाबत चर्चा सुरू आहे.

banner 728x90

दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून बसचालकास तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. मद्यपी चालकाने बस चालवण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात समोर येत आहेत. खेड एस. टी. आगारातून २३ रोजी सायंकाळी ६ वाजता खेड पन्हाळजे बस (एम. एच. १४ बी. टी. २५९७) प्रवाशांना घेऊन निघाली.

बसमध्ये वाहक गजानन केंद्रे होते, तर चालक मंगेश आहाके हे बस चालवत होते. बस बहिरवली मार्गावरून भरधाव वेगाने धावत असताना रात्री ८ वा. च्या सुमारास सवणस गावानजीक समोरून येणाऱ्या दुचाकी सोबत बसची धडक झाली. यावेळी घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ निसार सुर्वे यांनी बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थेट दुचाकीच्या दिशेने येताना पाहून दुचाकीवर (एमएच ०८ बी. जी. ५५८४) स्वार

तीन मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी दुचाकी सोडून बाजूला उडी मारली, असे सांगितले. त्यामुळे त्याचा जीव वाचला; परंतु वाहनाचे नुकसान झाले. या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी वाहक व चालकाला चांगलेच धारेवर धरले.

यावेळी चालक मंगेश आहाके हा गणवेशात नसून त्याने मद्यप्राशन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत घटनास्थळी मोबाईलवर व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून एस.टी. प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर चालक आहाके पन्हाळजेवरून सकाळी ७ वाजता बस खेड स्थानकात घेऊन आल्यानंतर त्याला पुन्हा कोणत्याही इतर मार्गावर बसचालक म्हणून पाठवण्यात आलेले नाही.

या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार एसटी आगार व्यवस्थापक अथवा खेड पोलिस ठाण्यात २४ रोजी सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेली नसली, तरी महामंडळाकडून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी बोलताना दिली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *