कर्तृत्व, करुणा आणि कुशल व्यवस्थापनाचा संगम असलेल्या मिसेस परफेक्शनिस्ट – स्वप्ना प्रशांत यादव!

banner 468x60

एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व हे केवळ तिच्या वैयक्तिक यशात मोजले जात नाही, तर त्या व्यक्तीमुळे समाजाला मिळालेल्या उभारीत, दिलेल्या दिशेत आणि निर्माण झालेल्या विश्वासात मोजले जाते. १ सप्टेंबर हा दिवस अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा जन्मदिवस. व्यवस्थापन ही केवळ कला नाही, ती जबाबदारी आहे… आणि ती जबाबदारी स्वप्ना ताईंनी नेहमीच हसत-हसत यशस्वीरित्या पार पाडली आहे. मग ती जबाबदारी पती श्री. प्रशांतजी यादव साहेब यांच्या राजकीय वाटचालीत असो, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराची असो किंवा वाशिष्ठी डेअरीच्या प्रवासातील असो; सौ. स्वप्ना मॅडम कोणतीही कसर शिल्लक न ठेवता य़शस्वीरित्या सांभाळताना दिसतात. तेही न थकता, न कंटाळता. बारा तास तर कधी १८-२० तास राबूनही त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य कायम असते. त्यामुळेच कदाचित प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या मेहनतीचे कौतुकही होताना दिसते. कर्तृत्व, करुणा आणि कुशल व्यवस्थापनाचा संगम असलेल्या मिसेस परफेक्शनिस्ट सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!*

banner 728x90

कौटुंबिक वारसा
सौ. स्वप्ना यादव या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तसेच सहकारमहर्षी मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या कन्या. सुभाषरावांनी दिलेला वारसा म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्त, समाजाशी नाते आणि जनतेप्रती कर्तव्यभाव. हा वारसा त्यांनी आपल्या आयुष्यात अंगीकारला आणि आपल्या कार्यशैलीत रुजवला. आज त्यांच्या नेतृत्वातही तोच आदर्श दिसतो. “कुटुंबाकडून मिळालेला वारसा हे माझ्यासाठी सर्वांत मोठे भांडवल आहे”, असे त्या नेहमीच अभिमानाने सांगतात.

प्रशांत यादव यांची एक अदृश्य शक्ती*
पती श्री. प्रशांत यादव यादव साहेब यांच्या राजकीय प्रवासात सौ. स्वप्ना मॅडम यांची शक्ती नेहमीच भक्कमपणे राहिली आहे. नुकत्याच झालेल्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत मॅडमच्या या शक्तीची सर्वांनाच प्रचिती आलेली आहे. प्रचार आणि प्रसार यंत्रणेसह नेत्यांच्या सभा, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांचे नियोजन, वैयक्तिक गाठीभेटी, गावभेटींचे दौरे असो अशा अनेक गोष्टींच्या नियोजनाची जबाबदारी स्वीकारून या सगळ्या गोष्टी १०० टक्के यशस्वी करण्यासाठीची त्यांची धडपड आपण सर्वांनीच अनुभवली आहे. प्रशांत यादव साहेबांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात यादव साहेबांचे तब्बल १६०० समर्थक प्रवेश करणार म्हटल्यावर या सर्वांची मुंबईत जाण्यापासून मुंबईतून चिपळूणला सुखरूप पोहचेपर्यंत सौ. स्वप्ना यादव मॅडमनी घेतलेली प्रत्येक गोष्टीची काळजी हे सोपे काम नव्हते. चिपळूणहून ५८७ गाड्यांचा ताफा मुंबईपर्यंत नेऊन सुरक्षितपणे परत आणणे – हे त्यांचे नियोजनकौशल्यच दाखवते. मुंबईतून प्रत्येक कार्यकर्ता सुखरूप घरी पोहचला की नाही, वाटेत कुणाला काही अडचण वगैरे नाही ना, या काळजीपोटी प्रवासात आपल्या कर्मचाऱ्यांकडून आणि शक्य तितक्या पदाधिकारी व कार्यकर्त्याला फोन करून माहिती घेणाऱ्या सौ. स्वप्ना मॅडम यांची आपल्या माणसांप्रती असलेली आपुलकी दिसून येते. म्हणूनच पदाधिकारी आणि कार्यकर्तेही म्हणतात – “ताई आहेत, म्हणूनच नियोजन परफेक्ट!”

उद्योजकतेची दिशा*
सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या आदर्श व मार्गदर्शक सूचनांनुसार चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पारदर्शकता, विश्वासार्हता जपत सौ. स्वप्ना मॅडम आपले कार्य करतात. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा मोठा डोलारा सांभाळत असतानाच प्रशांत यादव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून वाशिष्ठी डेअरीच्या उभारणीतील त्यांच्या मेहनतीला दाद द्यावी लागेल. शेतकरी, महिला आणि युवकांना रोजगाराचा आधार देणारा व्यवसाय उभा करताना हा उद्योग केवळ व्यावसायिक न होता समाजाला याचा फायदा कसा होईल, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. ग्राहकांना दर्जेदार उत्पादन देण्याबरोबरच विश्वासार्हता वाढविण्यासह शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकडेही त्यांचा कल असतो. त्यांचा उद्योगविषयक दृष्टिकोन हा फक्त आर्थिक लाभापुरता मर्यादित नसून सामाजिक बदल घडवून आणण्याचा आहे. याच उद्देशाने आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, शेती क्षेत्रातील नव्या प्रयोगांची माहिती मिळावी, योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळावी, तरुण-तरुणींची पावले शेती क्षेत्राकडे वळावीत, याकरिता वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सलग दोन वर्षे भव्यदिव्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या कृषी महोत्सवाच्या यशाच्या पाठीमागेही सौ. स्वप्ना यादव मॅडमचे परिश्रम हेच कारण आहे.

कर्मचाऱ्यांचा भक्कम आधार
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था असो किंवा वाशिष्ठी डेअरी असो या दोन्ही संस्थांमधल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना सौ. स्वप्ना मॅडम यांच्या कार्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे मॅडमचा आदेश, मॅडमची सूचना म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला दिलेले काम १०० टक्के योग्य आणि अचूक कसे होईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाला, की मॅडमच्या व्यवस्थापनाचे, त्यांच्या कौशल्याचे कौतुक अनेकजण करतात. पण, स्वप्ना मॅडम मात्र “माझ्या टीमची मेहनत आहे”, असे सांगून सारे श्रेय आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना देतात. मॅडमकडून जाहीररित्या घेतली जाणारी ही दखल अधिकारी-कर्मचाऱ्यांना बळ देऊन जाते. त्यामुळेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भक्कम पाठबळ स्वप्ना मॅडमच्या पाठीशी निरंतर उभे आहे.

कार्यकर्त्यांची ताई*
सौ. स्वप्ना यादव मॅडम यांच्या कार्यपद्धतीतील खरी ताकद म्हणजे आत्मीयता. प्रशांत यादव त्यांच्या राजकीय कामात व्यस्त असताना एखादा कार्यकर्ता मॅडमकडे गेला, की मॅडम त्याच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. एखादी महिला रोजगारासाठी गाऱ्हाणे घेऊन आली, की तिला आधार देतात. त्यांच्या या स्वभावामुळेच कार्यकर्ता, महिला आणि तरुणींसाठी स्वप्ना मॅडम आपल्या ताई वाटतात. महिला सक्षमीकरणावर सौ. स्वप्ना यादव मॅडम यांनी अधिक भर दिला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता त्या प्रयत्न करीत आहेत. याची झलक वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवातही सलग दोन वर्षे पाहायला मिळाली. या महोत्सवात बचत गटांकरिता मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्याची संकल्पनाही स्वप्ना ताईंचीच. बचत गटांच्या महिलांना या कृषी महोत्सवात न भुतो…न भविष्यती… असाच अनुभव आला. ग्रामीण भागातील माझी प्रत्येक भगिनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आली पाहिजे आणि ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे, असा आग्रह असणाऱ्या स्वप्ना ताईंनी त्यादृष्टीने पावलेही उचलली आहेत.

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व*
व्यवसाय, समाजकार्य, राजकारण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये स्वप्ना मॅडम यांनी जो समतोल साधला आहे, तो विलक्षण आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे – संघर्षातून उमललेले फूल, व्यवस्थापनातून उजळलेला दीपस्तंभ आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्यामुळे प्रेरणा देणारे जीवन आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

      श्री. प्रशांत यादव यांच्या सहचारिणी म्हणून प्रत्येक सुखदुःखात यादव साहेबांना खंबीरपणे साथ देतानाच कौटुंबिक जबाबदारी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, वाशिष्ठी डेअरीचा कारभार आणि यादव साहेबांच्या राजकीय वाटचालीत साथ देण्याची जबाबदारी यादव मॅडम ज्या पद्धतीने सांभाळत आहेत तो अनुभव शब्दांत मांडता येणे कठीणच आहे.  यादव आणि चव्हाण या दोन्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे, त्यांच्या सुख-दुःखांकडे सौ. स्वप्ना मॅडमचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे त्यांच्याकडे या दोन्ही कुटुंबातील सदस्य एक आधारवड म्हणून पाहतात आणि त्यांचा आदरही तितकाच करतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण केवळ शुभेच्छाच देत नाही, तर त्यांच्या कार्याचा गौरव करतो. त्यांचे आयुष्य निरंतर आनंद, उत्तम आरोग्य आणि अखंड कर्तृत्वाने उजळत राहो. त्यांच्या कार्याचा सुगंध समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात दरवळत राहो आणि प्रशांत यादव यांच्यासोबत सौ. स्वप्ना यादव मॅडमची साथ अशीच निरंतर राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- गुलजार गोलंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *