राजापूर : रिक्षा व्यवसायातील वादातून दाम्पत्याला बेदम मारहाण; दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

राजापूर तालुक्यातील विलये, गुरववाडी येथे रिक्षा व्यवसायातील वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोन भावांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्री सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणपत दत्ताराम मांडवकर (वय ३३) हे आपल्या पत्नी वैदेही मांडवकर यांच्यासोबत घरासमोर रिक्षा व्यवसायाबाबत चर्चा करत होते. त्याच वेळी घरासमोरच राहणारे संशयित आरोपी संदीप दौलत गुरव आणि प्रफुल्ल दौलत गुरव तेथे आले. सुरुवातीला किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

वाद चिघळताच संदीप गुरव याने हातातील लाकडी बांबूने गणपत मांडवकर यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या पाठीच्या डाव्या बाजूवर तसेच उजव्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार करण्यात आला. आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैदेही मांडवकर यांनाही आरोपीने लक्ष्य केले. त्यांच्या उजव्या हातावर बांबूने मारहाण करण्यात आल्याने त्या देखील जखमी झाल्या.

दरम्यान, प्रफुल्ल गुरव याने गणपत मांडवकर यांची मान पाठीमागून पकडून त्यांना पाठीवर हाताने मारहाण केली. या दोन्ही आरोपींकडून फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करण्यात आली तसेच ‘ठार मारण्याची’ धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर जखमी अवस्थेत गणपत मांडवकर यांनी तातडीने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत २५ मार्च रोजी पहाटे ४:२० वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१), १३१ आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ७२/२०२६) दाखल केला आहे.

या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *