गुहागर : सागरी कासवाची पहिली पिल्लं गुहागर किनाऱ्यावरुन समुद्रात रवाना

banner 468x60

समुद्री कासव विणीच्या यंदाच्या हंगामातील पहिली पिल्ले बुधवार दि. १४ जानेवारी रोजी रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्यावरुन समुद्रात रवाना झाली . सागरी कासवांच्या यंदाच्या विणीच्या हंगामातील कोकण किनारपट्टीवरील पहिले घरटे नोव्हेंबर महिन्यात गुहागर मध्ये सापडले होते. त्यामधून बाहेर पडलेल्या काही पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात आले.

banner 728x90


कोकणकिनारपट्टीवर समुद्री कासवांनी अंडी घालण्यासाठी सुरुवात केली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. वन विभागाच्या कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाच्या माध्यमातून कासव संवर्धनाच्या कामाचे नियोजन केले जाते. त्यांच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी २२ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.

समुद्री कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या कोकणात अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. महाराष्ट्रातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी जवळपास ३०० घरटी आढळून आली होती.

अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामातील पहिले घरटे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आले होते. त्यामधील १२८ अंड्यांना कासवमित्रांनी संरक्षित केले होते.

गुहागरच्या किनाऱ्यावर बाग, वरचा पाट आणि खालचा पाट याठिकाणी समुद्री कासव संवर्धनासाछी सहा हॅचरी तयार करण्यात आल्या आहेत. या किनाऱ्यावर ११ कासवमित्रांकडून संरक्षणाचे काम केले जाते.

समुद्री कासवाच्या मादीने किनाऱ्यावर खड्डा करुन त्यामध्ये टाकलेली अंडी ही कासवमित्रांकडून हॅचरीमध्ये संरक्षित करण्यात येतात. अशाच प्रकारे संरक्षित केलेल्या घरट्यामधून शनिवारी पहाटे ३३ पिल्ले बाहेर पडली. जी कासवमित्रांनी सुखरुपरित्या समुद्रात सोडली. कासवांच्या अंडी उबवणीचा काळ हा ५० ते ६० दिवसांचा असतो. उबवणीच्या प्रक्रिया बाहेरील तापमानावर अवलंबून असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *