तवसाळ :सचिन कुळये गुहागर तालुक्यातील पडवे उर्दू केंद्राच्या दोन दिवशीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन यंदा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नंबर १ येथे करण्यात आले आहे.
दि. १६ व १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला असून, खेळाडूंच्या जोडीला ग्रामस्थांच्या उत्साहाने स्पर्धेत मोठी रंगत आणली आहे.
कुडली गावच्या ग्रामस्थांनी आणि महिला मंडळाने या स्पर्धेच्या निमित्ताने पाहुणचाराचा नवा आदर्श घालून दिला आहे.
स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे आणि क्रीडा रसिकांचे कुडली ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
नियोजनातील शिस्त आणि आगत्य यामुळे या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.या क्रीडा स्पर्धेसाठी तवसाळ, तांबडवाडी आणि बाबरवाडी येथील शिक्षण प्रेमी नागरिक, पालक आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान वयातच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना योग्य प्रोत्साहन मिळावे, यासाठी पालकांचा हा सहभाग मोलाचा ठरत आहे.
“खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये शिस्त येतेच, पण आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उंचावण्यासाठी लागणारा जिद्द आणि आत्मविश्वास या मैदानातूनच मिळतो,” अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पडवे उर्दू केंद्रातील सहभागी शाळांपैकी यंदाच्या ‘जनरल चॅम्पियनशिप’वर कोणती शाळा आपले नाव कोरते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कुडली शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ अहोरात्र मेहनत घेत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













