गुहागर :ग्रामपंचायत उमराठ व उपकेंद्रातर्फे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान उत्साहात संपन्न

banner 468x60

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने

banner 728x90

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व अॅनिमीया मुक्त अभियान’ नुकतेच सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी उमराठ येथील श्री नवलाई देवीची सहाण येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

अभियानाचे उद्घाटन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते फित कापून, श्रीफळ वाढवून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

उमराठ आरोग्य उपकेंद्राच्यावतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. राधा आंबेकर यांनी अभियानाची प्रस्तावना व मुख्य उद्देश स्पष्ट करत कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.

सरपंच जनार्दन आंबेकर यांनी यावेळी उत्तम रांगोळ्या काढणाऱ्या कलाकारांचे तसेच पोषण आहारात परिपूर्ण अन्न ताट व विविध पदार्थांचे सुंदर प्रदर्शन भरवणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या अभियानात नागरिकांसाठी रक्तदाब व मधुमेह तपासणी, गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासण्या, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग व सिकल सेल आजार तपासणी, डोळे व दात तपासणी (डॉ. जोशी व NAB Eye Hospital Team), तसेच वजन व उंची तपासणी करण्यात आली.

याव्यतिरिक्त, आयुष्यमान भारत कार्ड KYC करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या तपासणी शिबिराचा लाभ बहुसंख्य महिला, मुली, लहान बालके आणि पुरुष ग्रामस्थांनी घेतला.

यावेळी महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. महिलांनी आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल समुपदेशन करण्यात आले.

किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन तसेच पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबद्दल माहिती देण्यात आली. उमराठ व उमराठ खुर्दच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनवून आणलेल्या पाककला व पाककृती महोत्सवाचे प्रदर्शनही या अभियानाचे विशेष आकर्षण ठरले.

​या अभियानासाठी तालुका आरोग्य विभागाचे मोबाईल व्हॅन पथक (डॉ. वैभव तोंडे, फार्मसिस्ट प्रजोत नरोटे आणि सहकारी), आरोग्य सहाय्यक दत्तात्रय मुद्दामवार, आरोग्य सहायिका लक्ष्मी बिर्जे, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे, पोलीस पाटील वासंती आंबेकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम यांच्यासह अनेक मान्यवर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सदर अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, उमराठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे तसेच ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्व सहभागी ग्रामस्थांचे कौतुक करत आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *