जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर कारवाईचा बडगा उगारत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर तालुक्यात एका इसमाला बेकायदा शस्त्रांसह रंगेहाथ अटक केली. संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून बंदूक, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा घातक साठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे व त्यांचा वापर रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मार्च २०२६ रोजी एक पथक गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
दरम्यान, गुहागर–शृंगारतळी मार्गावर मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करणारा संजय फनगुसकर हा शस्त्रे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा व ८ जिवंत काडतुसे आढळून आली.
या कारवाईत शस्त्रे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) १९५९ च्या कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीने ही शस्त्रे कोठून आणली व त्यांचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














