गुहागर : भरतीत पर्यटकांची स्कॉर्पिओ अडकली

banner 468x60

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर वाळूत वाहन नेण्यास स्पष्ट बंदी असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करून कोल्हापूर येथील पर्यटकांनी स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात अडकण्याची गंभीर घटना रविवारी रात्री घडली. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे वाहन काही मिनिटांतच समुद्राच्या पाण्यात खोलवर फसले. जवळपास दोन तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेत पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनंतर वाहन सुरक्षित बाहेर काढले.

banner 728x90

या घटनेत स्कॉर्पिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुहागरचा समुद्रकिनारा सुमारे सहा किलोमीटर पसरलेला असून पर्यटनासाठी हा किनारा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून पर्यटकांना वारंवार सूचना देऊनही काहीजण समुद्रकिनारी वाळूत वाहन नेण्याचा धोका पत्करतात. अशाच बेपर्वाईमुळे ही घटना घडली.


कोल्हापूर येथील दोन युवकांनी गुहागर–वरचापाट–पिंपळादेवी मार्गाने स्कॉर्पिओ नेत सिमेंटच्या रॅम्पवरून थेट समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश केला. त्या वेळी भरतीचा जोर वाढत असल्याने काही क्षणांतच वाहन पाण्यात खोलवर अडकले. वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरताच परिस्थिती गंभीर बनली. सुरुवातीला युवक वाहन वाचवण्यासाठी भरती ओसरल्यावर स्कॉर्पिओ बाहेर येईल या अपेक्षेने जवळपास एक तास थांबले.

मात्र पाण्याची पातळी अधिकच वाढू लागल्याने वाहन पूर्णपणे फसायची परिस्थिती निर्माण झाली. अखेर घाबरून त्यांनी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधला. संदेश मिळताच गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या भरतीमुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत होती. तातडीने जेसीबी बोलावून दोन तासांच्या संयुक्त मोहिमेत पोलिस, जेसीबी ऑपरेटर आणि स्थानिक ग्रामस्थांनी वाहनाला दोरखंडांनी बांधून ओढून शेवटी पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *