गुहागर : आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीचा गुणदर्शन सोहळा जल्लोषात!

banner 468x60

जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे १८ मार्च २०२६ रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

banner 728x90

कार्यक्रमाची सुरुवात महिला मंडळाच्या हळदी-कुंकू समारंभाने झाली. मुख्याध्यापक अंकुर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.

या वेळी शाळेतील सहशिक्षक संदीप भोये आणि साईनाथ पुजारा यांना निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गेल्या दोन वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळाच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित सर्वजण भावुक झाले. निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ, तवसाळ तांबडवाडी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी कार्यक्रम रंगतदार झाला. “गणेशाला वंदन” या समूहगीताने सुरुवात होताच वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर “काढीन घोंगडं घेऊद्या की…” या गाण्यावर विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विनोदी नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती दर्शवणारे ‘तारपा’ नृत्य. या नृत्याला प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ देत भरभरून दाद दिली.

या कार्यक्रमाला तवसाळ तांबडवाडीचे सुपुत्र व सोशल मीडियावर सक्रिय असलेले डीजे सचिन कुळये यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

विद्यार्थी, माजी विद्यार्थी, महिला मंडळ व ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रेक्षकांनीही विद्यार्थ्यांना बक्षिसे देत उत्साह वाढवला.

शेवटी ग्रामस्थ, महिला मंडळ व युवा पिढीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *