हिंदु गर्जना प्रतिष्ठान, दाभोळ यांच्या वतीने यंदा शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या वर्षी उत्सवाचे १३ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचा जागर जनतेमध्ये व्हावा, या उद्देशाने विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाची सुरुवात मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेने होणार आहे. ही स्पर्धा ढोरसई साई मंदिर येथून सुरू होऊन दत्तमंदिर, बोरीबंदर, जुने पोलीस स्टेशन, भंडारवाडा मार्गे इंगळादेवी भैरी मंदिर येथे समाप्त होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नागरिक, युवक-युवती आणि क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह असून विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ७,००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५,००१ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३,००१ रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

त्याच दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता शिवचरित्र आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. परेश मळणगांवकर (शिवशांभो विचार मंच, उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक, सदस्य – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ रायगड, तसेच महाराष्ट्र शासनाचा कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे व्याख्यान कै. कमळाकर तथा भाई नरवणकर सभागृह, दत्तमंदिर, वरचा विभाग, दाभोळ येथे होणार आहे.
शिवजयंतीचा मुख्य सोहळा बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ८.३० वाजता सिमेवरील गणेश मंदिरात श्रींचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता दाभोळ साई मंदिर, ढोरसई येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिवभक्त, युवक, महिला व विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
उत्सवाचा समारोप दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या वीर झुंजार मर्दानी खेळ (शिवकालीन युद्धकला) सादरीकरणाने होणार आहे. स्व-संरक्षण प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने लाठी-काठी, दांडपट्टा, ढाल, तलवार, भाला यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून शिवकालीन युद्धकलेची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा हा उपक्रम आहे.
हिंदु गर्जना प्रतिष्ठान, दाभोळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांना दाभोळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमित देवळेकर (7038878730), प्रविण वणकर (8805919768) आणि रोहन यादव (9552568693) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















