चिपळूण शहराच्या पूरमुक्तीला चालना मिळण्यासाठी याहीवर्षी वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा मोहीम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, गोवळकोट व पेठमाप येथे गाळ उपसा केला जात आहे. आतापर्यंत वाशिष्ठी नदीतून ८० हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
चिपळूण शहर व परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यानंतर वाशिष्ठी आणि शिवदीतील गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला. गाळ उपशाला चालना मिळण्यासाठी नागरिकांच्या साथीने चिपळूण बचाव समितीने महिनाभर आंदोलन छेडले.
या साऱ्याचा परिपाक म्हणून चिपळुणात गाळ उपशासाठी पहिल्या वर्षी मोठी यंत्रणा कामाला लागली. दुसऱ्याही वर्षी गाळ उपशाचे काम जोमाने सुरू राहिले. मात्र गेल्या दोन तीन वर्षांत चिपळुणातील यंत्रणा अन्यत्र हलवण्यात आली. त्यामुळे गाळ उपशाचा वेग मंदावला. सध्या यांत्रिकी विभागाकडून ५ पोकलेन आणि ११ डंपरच्या साह्याने गाळ उपसा केला जात आहे.
शहरातील बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप येथे गाळ उपशाचे काम सुरू आहे. काढलेला बहुतांशी गाळ हा खासगी जागेत टाकला जात आहे. ज्यांनी महसूल विभागाकडे रॉयल्टी भरली आहे, अशा व्यक्तींच्या जागेत गाळ टाकला जात आहे. यापूर्वी शहर परिसरातील शासकीय जागेत हा गाळ टाकण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने गाळ काढला जात असल्याने गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पुराची समस्या जाणवली नव्हती.
नलावडा बंधारा उभारण्यात आल्याने शहरात पाणी भरण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपसा मोहीम सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत वाशिष्ठी नदीतील सुमारे ८० हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. गणेश विसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप येथे गाळ उपसा केला जात आहे. यासाठी ५ पोकलेन आणि ११ डंपर कार्यरत आहेत असे विपुल खोत, उपअभियंता, जलसंपदा विभाग यांनी सांगितले .

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














