दापोली : मिनिबसच्या अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

banner 468x60

हर्णे-आंजर्ले मुख्य रस्त्यावर गाडी रिव्हर्स घेताना हॉटेलच्या कठड्यावरून सुमारे दहा फूट उंचीवरून खाली डांबरी रस्त्यावर पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना दापोली तालुक्यात घडली होती . या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील आणि मित्रांसह प्रवास करणाऱ्या आठ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

हा अपघात मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील हर्णे ते आंजर्ले रस्त्यावर, सॅफेरॉन हॉटेलच्या गेटसमोर झाला. पुणे येथील हितेश रमेश चौधरी (वय ४०) यांनी या अपघाताची तक्रार दापोली पोलिसांत दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेश रमेश चौधरी हे त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह एम.एच-१४ जी.यु. १६१६ क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरने हर्णे येथील सॅफेरॉन हॉटेल येथून फिरून निघाले होते. त्यांचे वाहन हर्णे ते आंजर्ले या मुख्य रस्त्यावर आले असता, आरोपी वाहनचालक सुरेश साहेबराव कुचेकर (वय ५४, रा. चिंचवडे नगर, चिंचवड, पुणे) याने वाहन भरधाव वेगात चालवले.
रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि वळण लक्षात न घेता चालकाने नियंत्रण गमावले. त्यामुळे वाहन थेट हॉटेलच्या कठड्यावरून सुमारे दहा फूट उंचीवरून खाली मुख्य डांबरी रस्त्यावर पलटी झाले. अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले, तसेच वाहनातील व्यक्तींना किरकोळ दुखापती झाल्या.

या अपघातात एकूण आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये फिर्यादी हितेश रमेश चौधरी (वय ४०), क्षितीज गुगळे (वय ३५), पराग गायकवाड (वय ४०), ४ वर्षीय बालक ओजस कलकर्णी, नेहा गायकवाड (वय ३६), चालक सुरेश कुचेकर (वय ५४), महेश वाघमारे (वय ३९) आणि प्राजक्ता महेश वाघमारे (वय ३६) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुणे परिसरातील वाकड, बाणेर आणि चिंचवड येथील रहिवासी आहेत.

या गंभीर अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल दापोली पोलिसांनी वाहनचालक सुरेश साहेबराव कुचेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवून निष्काळजीपणा करणे) आणि १२५(ब) (अपघात) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (बेदरकारपणे आणि धोकादायकपणे वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा (गु.र.क्र. २३०/२०२५) नोंदवण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपासणी दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *