रत्नागिरी : आंबा बागेला लागलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे रामेश्वर वाडी येथे आंबा बागेला लागलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. कष्टाने जोपासलेली बाग वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना प्राण गमवावे लागल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला.

banner 728x90


वणव्यात होरपळून मृत पावलेल्या शेतकऱ्याचेन नाव भरत दिगंबर धारगळकर असे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाखरे येथील वैद्य यांच्या मालकीच्या आंबा बागेत फवारणीचे काम सुरू होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बागेच्या बाहेरील बाजूला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे ही आग वेगाने बागेच्या दिशेने सरकू लागली. आपली आंबा बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये, या उद्देशाने भरत धारगळकर हे तातडीने वनवा विझवण्यासाठी धावले.

मात्र, आगीच्या भीषण ज्वाळांमुळे ते गंभीररीत्या भाजले गेले आणि धुरामुळे गुदमरून ते तिथेच जमिनीवर कोसळले. बागेच्या मालकांनी ही भीषण परिस्थिती पाहताच त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून ‘मयत’ घोषित केले.


या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भरत धारगळकर यांच्या अशा अचानक जाण्याने नाखरे गावावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय शिगवण आणि संदीप महाडिक या घटनेचा अधिक तपास करत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत लागणारे हे वनवे बागायतदारांसाठी किती जीवघेणे ठरू शकतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *