मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, शनिवारी ४ एप्रिल रोजी लांजा येथे एका ६ महिने वयाच्या मादी बिबट्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेने या बिबट्याच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे लांजा येथील गोवा ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लगत असलेल्या लांजा कुक्कुटपालन संस्थेच्या नारळ, आंबा आणि काजूच्या बागेत एक बिबट्या मृत अवस्थेत पडलेला आढळला. कुक्कुटपालन संस्थेचे संचालक श्री. प्रवीण जेधे यांनी शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास वनविभागाला या घटनेची भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. माहिती मिळताच वनपाल लांजा आणि वनरक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. हा बिबट्या सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी (लांजा) यांनी घटनास्थळी बिबट्याची तपासणी केली. त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एखाद्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्याच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर मार बसला, जो त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनानुसार, मृत बिबट्या हा मादी जातीचा असून तिचे वय साधारण ६ महिने होते. वनविभागाने या घटनेचा रीतसर गुन्हा नोंदवला असून, कागदपत्रांची पूर्तता करून पुढील तपास सुरू केला आहे.
सदरची संपूर्ण कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वनअधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. प्रत्यक्ष घटनास्थळी वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे आणि रेस्क्यू टीमचे सदस्य अमित लांजेकर यांनी परिश्रम घेतले.
वन्यप्राण्यांच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा एखादा वन्यप्राणी अडचणीत सापडलेला आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













