चिपळूणात अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बालिकेचा झोपेत मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कापसाळ-माटेवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. केवळ दोन दिवसांच्या नवजात बालिकेचा झोपेतच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता उघडकीस आली.

banner 728x90


फिर्यादी अरुण अशोक राणे (मूळ रा. तोंडलीपिलवली, मिरवणेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) सध्या कापसाळ-माटेवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नी सोनाली अरुण राणे यांनी २५ ऑक्टोबर रोजी मार्कडी येथील हजबे डॉक्टर यांच्या रुग्णालयात एका बालिकेला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर २६ ऑक्टोबरच्या रात्री आई व मुलीला डिस्चार्ज मिळाला आणि दोघी घरी परतल्या.

२७ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११ वाजता सोनाली यांनी बाळाला दूध पाजून झोपवले. मात्र, पहाटे ४.४५ वाजता बाळाची हालचाल थांबलेली व रडणे बंद असल्याचे त्यांनी पाहिले.

त्यांनी तातडीने पतीला माहिती दिली. तत्काळ बालिकेला उपचारासाठी कामथे हॉस्पिटल येथे नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासणीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद (A.D.) चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राणे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *