दापोली : बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आढळला मृतदेह

banner 468x60

दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. सुनिल काशिराम वारीक (वय ४०, रा. सडवे, वारीकवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, टांगर येथील विश्वदीप भागराम मर्चडे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या हॉलमध्ये सुनिल वारीक हे झोपलेल्या स्थितीत आढळले. खबर देणारे अमित चंद्रकांत काताळकर हे वारीक आणि जयंत पारकर यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांना हे दृश्य दिसले. काताळकर यांनी सुनिल वारीक यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने टांगर गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेतले.

सरपंच आणि पोलीस पाटील यांनी पाहणी केल्यानंतरही त्यांच्यात कोणतीही हालचाल दिसून न आल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, रात्री ८ वाजून २६ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजून ३६ मिनिटांनी दाखल करण्यात आली आहे. सुनिल वारीक यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात ‘अमृ. क्र. ७८/२०२५’ प्रमाणे ‘बी.एन.एस.एस १९४’ अन्वये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *