दापोली : कोकणातील समृद्ध संस्कृती, लोककला आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यंदाही दापोली येथे भव्य दापोली सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. कोळथरे येथील कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जात असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे या महोत्सवाला मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. दि. २१ व २२ मार्च २०२६ रोजी (शनिवार व रविवार) हा महोत्सव दापोली येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून दापोली परिसरासह संपूर्ण कोकणातील विविध पारंपरिक कला, लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच नवोदित कलाकारांनाही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, तसेच विधानपरिषद आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर दापोलीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारे काटखेल आणि जाखडी या लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दापोलीतील विविध नामवंत कलाकारांचा सहभाग असलेला “भक्तीरंग” या संकल्पनेवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, संगीत, वादन, चित्रकला आणि गायन अशा विविध कलांचा अनोखा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. याच दिवशी सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे हे उपस्थित रसिकांशी संवादही साधणार आहेत.
दि. २२ मार्च रोजी दिवसभर चित्रकला आणि रांगोळीचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी “सूर तेच छेडिता” हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, ऋषिकेश रानडे, सुप्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब, तसेच आर्चिस लेले आणि कमलेश भडकमकर यांच्या संचाचा सुरेल कार्यक्रम होणार असून संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
या महोत्सवानिमित्त कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा एकल (Individual) आणि सामूहिक (Group) अशा दोन गटांमध्ये होणार आहेत. दि. २० मार्च रोजी दुपारी एकल गटातील चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी आणि रिल्स या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
तसेच दि. २१ व २२ मार्च रोजी सामूहिक गटातील खालूबाजा, कोकणातील लोककला (काटखेल, जाखडी, कोळी नृत्य इ.), नाट्यछटा तसेच भजन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून परिसरातील कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक लोककला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पर्धा संयोजक प्रीती वैद्य यांनी सांगितले.
सामूहिक स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकाला १०,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला ७,००० रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाला ५,००० रुपये व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर एकल स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाला ३,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला २,००० रुपये व चषक, तसेच तृतीय क्रमांकाला १,५०० रुपये व चषक असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धांमध्ये परिसरातील कलाकार, सांस्कृतिक मंडळे, भजनी मंडळे तसेच महिला व युवा मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक मिहीर महाजन यांनी दापोली तालुक्यातील नागरिकांना केले आहे. या महोत्सवाच्या आयोजनामध्ये युवा प्रेरणा कट्टा टीमचा विशेष सहभाग असून या उपक्रमामुळे दापोली परिसरातील सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














