दापोलीत थंडीचा जोर कायम; किमान तापमान ८ अंशांवर

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कायम असून मागील २४ तासांत किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषि विद्या विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या माहितीनुसार दापोलीतील कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.

banner 728x90

गतवर्षी याच तारखेला दापोलीत कमाल तापमान ३३.२ अंश तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअस होते. यंदा त्याच्या तुलनेत कमाल तापमानात सुमारे २ अंशांची घट तर किमान तापमानात १ अंशांची घट झाल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.

थंड हवामानाचा परिणाम सकाळच्या वेळी अधिक जाणवत असून दापोली शहरासह ग्रामीण भागात पहाटे व सकाळी दव पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढविला असून शेतकऱ्यांमध्येही थंडीबाबत चर्चा सुरू आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्याचे हवामान भाजीपाला व काही पिकांसाठी अनुकूल असले तरी अतिथंडीमुळे काही पिकांवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांवर योग्य काळजी घ्यावी, पाणी व्यवस्थापन योग्य ठेवावे तसेच हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांतही सकाळी थंडी कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सौजन्य : ग्रामीण कृषि मौसम सेवा
कृषि विद्या विभाग
डॉ. बा.सा.कों.कृ.वि., दापोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *