दापोली सलीम रखांगे : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२४, सिझन ६ सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
रविवार १० नोव्हेंबर २०२४ रोजी परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला उत्साहात सुरवात झाली.
यामध्ये महाराष्ट्रातील, इतर राज्यातील, परदेशातील वय ८ ते ६४ वयोगटातील १२० स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते.
दापोली चिखलगाव दाभोळ पंचनदी गोमराई बुरोंडी लाडघर कर्दे मुरुड सालदुरे आसुद दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ६५ किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली.
मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी स्थानिक पदार्थ, मासे खाल्ले. १००० मीटर हुन अधिक चढ उतार असणाऱ्या या आव्हानात्मक हॉर्नबिल सिनिक रुट मार्गावर सायकल चालवणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यामध्ये मलेशिया देशातून आलेले ६४ वर्षीय एस सांगरन, ६०+ वयोगटातील नितीन मुळे (लोहगाव), राजू औटी (पुणे), मेजर दीपक जांभळे (सासवड), विनायक वैद्य (खेड), वर्षा येवले (कल्याण), रोहित आंबेकर आणि वांडरर्स टीम (पनवेल), टँडम सायकलने पूर्ण करणारे आनंद ठाकर (पाषाण), सिंगल गिअर सायकलने पूर्ण करणारे निलेश गावकर (कणकवली सिंधुदुर्ग) इत्यादींना खास सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच ६५ किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार १३ वर्षीय आयुष शिंदे, अवधूत पाते, वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, प्रमोद जैन हे ठरले.
या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काहीजण सायकल चालवत मुंबई पुणेहुन आले होते. तसेच सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले इंग्लंड येथील डेव्हिड आणि जेट यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले.
या सायक्लोथॉनच्या निमित्ताने दापोलीचे सौंदर्य कुटुंबासह पाहता आल्यामुळे बाहेरगावाहून आलेले सर्व रायडर खुश होते. अनेकांनी २ ते ६ दिवस मुक्काम करुन स्थानिक वस्तूंची खरेदी केली, भटकंती केली.
सायक्लोथॉनसाठी दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, राहुल मंडलिक, हॉटेल सागर सावली इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले.
या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, अजय मोरे, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.
१७ नोव्हेंबर २०२४ रोजी शॉर्ट सिटी लूप राईड आणि फॅन राईड असेल, त्यामध्ये सर्वांनी सहकुटुंब सहभागी असे आव्हाहन दापोली सायकलिंग क्लब तर्फे करण्यात आले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*