दापोलीतील भडवळे शेरेभोईवाडी परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी बसमधील डिझेल चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, ३० मार्च रोजी पहाटे पोलिसांनी संबंधित चोरट्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली व खेड आगारातील एसटी बसमधून वारंवार डिझेल चोरी होत होती. या सततच्या प्रकारामुळे प्रशासन आणि पोलिस यांच्यासमोर चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अनेकदा प्रयत्न करूनही आरोपी हाती लागत नव्हता.
दरम्यान, दापोली आगाराचे चालक संतोष कांदेकर, कंडक्टर आर. पी. पवार, खेड आगाराचे चालक डोंगरे तसेच कर्मचारी चेतन मिरगल आणि शंकर गायकर यांनी सतर्कता दाखवत संशयित हालचालींवर लक्ष ठेवले. त्यांच्या या जागरूकतेमुळे अखेर ३० मार्च रोजी पहाटे चोरटा रंगेहात पकडण्यात आला.
चोरीसाठी आरोपीने चारचाकी वाहनाचा वापर केला होता. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये ३५ लिटर डिझेल भरलेला एक कॅन, तीन रिकामे कॅन, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार अशा नावाच्या पाट्या, तसेच एक बंदूक आणि जिवंत काडतुसे आढळून आले. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणातील शस्त्रास्त्रांच्या सापडलेल्या बाबीमुळे या चोरीमागे आणखी मोठे जाळे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीने शासनाच्या नावाच्या पाट्यांचा वापर करून संशय टाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. या चोरीप्रकरणामागील इतर साथीदार, तसेच यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













