दापोली तालुक्यातील केळशी गावात सार्वजनिक धार्मिक स्थळ असलेल्या ‘हुजरा’च्या कुलुपावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांतील अनेकजण जखमी झाले असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे केळशी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना दिनांक ९ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. येथील उरुस उत्सवासाठी काही लोकांनी सार्वजनिक इमारतीचे (हुजरा) कुलूप तोडल्याचा आरोप आहे. याच कारणावरून जाहिद अब्दुल रजाक डायली आणि झाकीर इस्माईल होडेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन गट आमने-सामने आले.
जाहिद अब्दुल रजाक डायली यांच्या तक्रारीनुसार (गु.र.नं. १६८/२०२५):
जाकीर इस्माईल होडेकर आणि त्यांच्यासोबत १५ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून आपल्याला आणि कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत पत्नी अतिका जाहिद डायली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १८९(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
जाकीर ईस्माईल होडेकर यांच्या तक्रारीनुसार (गु.र.नं. १६९/२०२५):
आरोपी अतिक जावेद डायली आणि त्यांच्यासोबत ३४ जणांनी आपल्याला आणि मित्राला (इजाज महमद झांजु) शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या खिशातील १० हजार रुपये, मोबाईल आणि घड्याळ हरवले.
तसेच, मित्राची मोटारसायकल तोडून १५ हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी कलम १८९(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहेत.
या दोन्ही घटना एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, गावातील शांतता राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका क्षुल्लक कारणावरून दोन गटांत झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*