कोकणातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि जिज्ञासा पुन्हा एकदा अधोरेखित करणारी अभिमानास्पद घटना समोर आली आहे. दापोली येथील हेरंब मुकुंद लोंढे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवकाश संशोधन उपक्रमात सहभाग घेत संभाव्य लघुग्रहाची नोंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हेरंबने आंतरराष्ट्रीय ॲस्टेरॉइड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत अवकाशातील दुर्बिणीद्वारे टिपलेल्या प्रतिमांचा अभ्यास केला. या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना अवकाशातील हजारो प्रतिमा दिल्या जातात. या प्रतिमांमध्ये सूक्ष्म हालचाली करणाऱ्या वस्तूंचा शोध घेणे आणि त्यांची नोंद करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. हेरंबने अत्यंत बारकाईने या प्रतिमांचा अभ्यास करताना एका वस्तूची हालचाल लक्षात घेतली आणि संभाव्य लघुग्रह म्हणून त्याची नोंद केली.
त्याने नोंदवलेले हे निरीक्षण “L.Heramb – P12kFHS” या कोडसह प्रीलिमिनरी ॲस्टेरॉइड डिटेक्शन म्हणून नोंदवण्यात आले आहे. या संभाव्य लघुग्रहाची पुढील वैज्ञानिक पडताळणी सध्या Minor Planet Center मार्फत सुरू आहे. ही संस्था International Astronomical Union अंतर्गत कार्यरत असून जगभरातील लघुग्रह, धूमकेतू आणि इतर अवकाशीय वस्तूंच्या शोधांची अधिकृत नोंद ठेवण्याचे काम करते. या पडताळणीनंतर हा लघुग्रह निश्चित झाल्यास त्याची अधिकृत नोंद केली जाणार आहे.
हेरंब सध्या खेड येथील Rotary English Medium School Khed येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. लहान वयापासूनच त्याला विज्ञान आणि अवकाशाविषयी विशेष आकर्षण आहे. अभ्यासाबरोबरच विज्ञानविषयक उपक्रमांमध्ये तो सक्रियपणे सहभागी होत असतो.
हेरंबचे वडील डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून आई डॉ. रेणू मुकुंद लोंढे यादेखील पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. पालकांनी दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळेच हेरंबला विज्ञान क्षेत्रात आवड निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
लहान वयातच अवकाश संशोधनाशी संबंधित महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवल्यामुळे हेरंबचे शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या या यशामुळे दापोली आणि खेड परिसराचा अभिमान वाढला असून भविष्यातही तो विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














