दापोली : पालगड विद्यालयात ‘जल्लोष 2025’ सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा

banner 468x60

पूज्य साने गुरुजी विद्यमंदिर, पालगड प्रशाळा व साने गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष 2025’ सोमवार, दि. ८ डिसेंबर 2025 रोजी साने गुरुजी कलामंदिर, पालगड येथे उत्साहात साजरा झाला. पालगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष शोभा आली.

banner 728x90

कार्यक्रमाचे उद्घाटन पालगडचे व्यावसायिक श्री महेश रघुनाथ राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती आणि नटराज प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी सर्व आगंतुक मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. मंजिरी शितूत यांनी नमन नटवरा या सुरेल नांदीने कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंगेश गोंधळेकर, विश्वनाथ तांबडे, रत्नाकर गुरव, पोलीस पाटील श्री रुपेश बेलोसे, तसेच पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गायकवाड, संगीत शिक्षक प्रदीप सुतार यांचीही उपस्थिती कार्यक्रमात विशेष ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात इंग्लिश मिडीयम शाळेतील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहान बालकलाकारांनी केली. पालकांच्या सक्रिय सहकार्यामुळे छोटे कलाकार विविध सादरीकरणांमधून प्रेक्षकांची मने जिंकत राहिले. त्यांच्या निरागस कलाविष्काराने सभागृहात आनंदाचे वातावरण पसरले.

त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी विविध कलाकृती सादर केल्या. पखवाज वादन, मूक अभिनय, लावणी, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, दक्षिणात्य नृत्य, मंगळागौर, गरबा, बिहू, खलाशी नृत्य, गोंधळ, भारुड अशा विविध नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि रंगतदार प्रस्तुतींना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, स्वयंसेवी संस्था व व्यापारी संघटनांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या बक्षिसे आणि शाबासकीमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

सांस्कृतिक सादरीकरणांसाठी मनुजा वादक, गणेश मुंगशे, सांस्कृतिक विभाग, तसेच रश्मी कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. तांत्रिक व छायाचित्रण सहकार्यासाठी सुशांत शिगवण, आदित्य मोरे, साहिरा फोटो स्टुडिओचे
सुयोग वाजे, पत्रकार समीर पिंपळकर,
नितीश धारिया आणि अक्षय जाधव यांनी योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री दत्तप्रसाद गुरव यांनी केले. शेवटी. मंजिरी शितूत यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पालक, गावकरी तसेच कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. माऊली डेकोरेटर्स, श्री दिनेश गायकर आणि पत्रकार समीर पिंपळकर यांनी यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

‘जल्लोष 2025’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार आणि उत्साहाने संपूर्ण पालगड पंचक्रोशी रंगून गेली. कार्यक्रम सर्वांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *