दापोली : कुत्रा शौचास बसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद आणि शिवीगाळ

banner 468x60

दापोली तालुक्यातील गोरीवलेवाडी (कोंढे) येथे केवळ कुत्रा शौचास बसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद उफाळून एका शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी महादेव जानू रेवाळे (रा. गोरीवलेवाडी, कोंढे, दापोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ जून रोजी रात्री ८.४५ वाजता घडली.

banner 728x90


फिर्यादी रुपेश वसंत गावडे (वय ३५, व्यवसाय शेती) हे आपल्या घरासमोर साफसफाई करत असताना आरोपी महादेव रेवाळे यांचा कुत्रा त्यांच्या जागेत शौचास बसलेला दिसला. हा प्रकार पाहून गावडे यांनी काठी फेकून कुत्र्याला हटकले. ही गोष्ट आरोपी रेवाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी संतापून गावडे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. “तुझ्या बापाचा रस्ता आहे का?” अशी आक्रमक भाषा वापरत रेवाळे यांनी गावडे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.

त्यानंतर अचानक त्यांच्या जवळ असलेल्या सुऱ्याने (धारदार शस्त्र) गावडे यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी घाव घातले. त्यातून गावडे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, गावडे यांच्या मदतीला धावलेली त्यांची पत्नी ऋतुजा गावडे, शेजारी स्मिता जयवंत राजीवले आणि अनुराग जयवंत राजीवले यांनाही आरोपीने हाताने मारहाण केली व धक्काबुक्की केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी महादेव रेवाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८(२), ११५(२), ३५१(१), ३५२ प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ११८/२०२५) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *