दापोली : हृदयविकाराच्या झटक्याने हॉटेल कामगाराचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जिन्यावरून पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

banner 728x90 banner 728x90

दापोली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम यासिन मुरूडकर (वय ३४, रा. टांगर) हे लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये आचारी म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलच्या जिन्यावरून खाली पडलेल्या अवस्थेत सहकाऱ्यांना आढळून आले. पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले होते. घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी सुमारे १२.४० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार त्यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच ते जिन्यावरून पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, ऐन रमजान महिन्यातच मुरूडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असलेल्या सद्दाम यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून वडिलांचे निधन यापूर्वीच झाले होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी मुरूडकर कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *