दापोली : बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू, पाजपंढरी येथील घटना

banner 468x60

दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे झोपेत बोटीवरून समुद्रात पडून तरुण खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९:३० वाजता उघडकीस आली. संजय शांताराम पोस्टुरे (३७, पंदेरी, बहीरवलीवाडी, मंडणगड) असे त्या मृत खलाशाचे नाव आहे.

शेजारी झोपलेल्या खलाशाला पोस्टूरे दिसून न आल्याने त्याचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती सुरेश चौगुले (५६, पाजपंढरी, पटेकरआळी, दापोली) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौगुले यांची सिद्धिविनायक मासेमारी बोट आहे. त्यांच्या बोटीवर संजय पोस्टुरे हा खलाशी म्हणून कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. बोटीवरील तांडेल व इतर खलाशी मासेमारी झाल्यानंतर हर्णे बंदर येथे बोटीवरच राहत असत. ५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता चौगुले यांची बोट मासेमारी करण्याकरिता समुद्रात गेली होती.

८ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान ही बोट हर्णे बंदरात परत आली. ९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान बोटीवरील खलाशी निवास हुमणे हा उठला तेव्हा त्याला बोटीवर त्याच्या शेजारी झोपलेला खलाशी संजय पोस्टुरे आढळून आला नाही. त्याने बोटीवर तसेच आसपासच्या समुद्र पाण्यात शोध घेतला.

पोस्टुरे कोठेही आढळून आला नाही. ही बाब त्याने बोट मालक चौगुले यांना सांगितली. चौगुले यांनी पोस्टुरे याचा शोधा-शोध करूनही तो न सापडल्याने दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दरम्यान, १० रोजी चौगुले यांच्या बोटीवरील कामगार, पोलीस तसेच गावातील शेजारी असे बेपत्ता पोस्टुरेचा हर्णे बंदर समुद्रकिनारी शोध घेत असताना हर्णे बायपास पाळंदे येथे सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या किनारी पाण्यात तरंगत असलेला तो आढळून आला.

त्याला किनार्‍यावर आणून पाहिले असता तो कोणतीही हालचाल करत नसल्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यानी तो मृत असल्याचे घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *