दापोली : बाळाला चुकीचा डोस, आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

banner 468x60

दापोलीमधील आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोस घेण्यासाठी आलेल्या साडेतीन महिन्याच्या बाळाला चुकीचा डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला आहे.

banner 728x90

याप्रकरणी आरोग्य विभागाने संबंधित परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.१८ फेब्रुवारी रोजी बाळाला डोस देण्यासाठी गावातील एक महिला माता आंजर्ले शासकीय दवाखान्यात वेगवेगळे तीन डोस बाळाला देण्यासाठी गेली होती.

त्यावेळी बाळाला एक डोस चुकीचा दिला गेला. गरोदर महिलेला जे टीटीचे डोस दिले जातात, तो डोस बाळाला दिला गेला. त्यानंतर बाळाला प्रचंड त्रास होऊ लागला. दापोली येथे उपचार केल्यानंतर आता बाळ बरा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्या दिवशी अनेक बालक डोस घेण्यासाठी आले होते. पण डोस चुकला आहे, हे एका वरिष्ठ परिचारिकेच्या लक्षात आले.

यामुळे मोठा अनर्थ टळला. हे जर त्याच्या लक्षात आले नसते तर सर्व बालकांना हाच डोस दिला गेला असता व गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. याप्रकरणी आरोग्य विभागाने संबंधित परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बाळाला त्रास झालेला नाही याबाबत दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परिचारिकेला आपण कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र महिलेला देण्यात येणारा डोस बाळाला देण्यात आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे.

या बालकाला दीड वर्षाचा झाल्यावर जो डोस द्यायचा होता तो चुकून साडेतीन महिन्याचा असतानाच दिला गेला. याचा बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास झालेला नाही, असे ते म्हणाले. शिवाय परिचारिकेकडून खुलासा आल्यानंतर तिच्यावर काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *