दाभोळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिवसेना (शिंदे गट)ने दणदणीत विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. ही निवडणूक मंत्री योगेश कदम यांच्या प्रतिष्ठेची मानली जात होती. अखेर या निवडणुकीत योगेश कदम यांना तिन्ही जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

दापोली मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)ने सर्व अपेक्षांवर मात करत विरोधकांना जोरदार धक्का दिला. चुरशीच्या आणि रंगतदार लढतीनंतर जिल्हा परिषद दाभोळ गटातून शिवसेनेच्या साधना महाजन यांनी भाजपच्या स्मिता जावकर यांचा 3188 मतांनी पराभव करत विजय मिळवला.


पंचायत समिती दाभोळ गणात शिवसेनेच्या नम्रता तोडणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका उजाळ आणि मनसेच्या अनुष्का महाडीक यांना पिछाडीवर टाकत मतदारांचा ठाम कौल आपल्या बाजूने वळवला.


तर पंचायत समिती बुरोंडी गणात शिवसेना (शिंदे गट)च्या अंकिता घुबडे यांनी भाजपच्या स्वप्नाली साठे यांचा पराभव करत शिवसेनेचा भगवा अधिक उंचावर नेला. या तिहेरी विजयानंतर दापोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट)ची राजकीय पकड अधिक मजबूत झाली आहे.

विजयाची घोषणा होताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण पसरले. ढोल-ताशांच्या गजरात भव्य विजय रॅली काढण्यात आली. कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावत आनंद साजरा केला. विजयाच्या आनंदात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत परिसर दणाणून सोडला.


“शाळा पाडता पाडता शाळा पाडणारेच तोंडावर पडले, जिथे शिकली तिथे मुकली” आणि “दाभोळ जि.प. कन्या शाळा भल्या-भल्यांना पुरून उरली, शाळेचा नाद करायचा नाय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर गाजून गेला.
दरम्यान, दाभोळमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते घरीच बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.हा विजय शिवसेना (शिंदे गट)साठी केवळ निवडणूक यश नसून, दाभोळ आणि दापोली तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचे स्पष्ट द्योतक मानला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















