दाभोळ : खाडीत आढळतात मृत मासे, सीईटीपीने प्रक्रीया न करता सांडपाणी सोडल्याचा आरोप

banner 468x60

दाभोळ खाडीत गेल्या तीन दिवसांपासून मृत मासे आढळल्याने माछीमारांनी संताप व्यक्त केला आहे. सीईटीपीसह लोटेतील काही कंपन्यांनी सांडपाणी नाल्याव्दारे सोडले असल्याचा आरोप दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीने केला आहे.

banner 728x90

यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यानी तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी बुधवारी केतकी, करंबवणे येथे जाऊन पंचनामा करत पाण्याचे नमुनेही घेतले आहेत.

सीईटीपीने प्रक्रीया न करता सांडपाणी सोडले, तर काही कंपन्यांनी आपले सांडपाणी सीईटीपीला न पाठवता थेट नाल्यात सोडल्याने ते खाडीच्या पाण्यात येऊन मिसळले असल्याचा आरोप दाभोळखाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी केला आहे. सध्या खाडीतील पाण्यावर तवंग असून पाण्यालाही उग्रवास येत आहे.

पाण्यावर ठिकठिकाणी मासे तरंगताना दिसत असल्याच्या तक्रारी खाडीलगतच्या गावांतील माछीमारांतून समितीकडे येत आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीईटीपी व्यवस्थापन आणि एमआयडीसीकडे तक्रार करण्यात आली आहे.

वेळीच लक्ष न दिल्यास माछीमारांमध्ये संतापाचा उद्रेक होईल असा इशारा जुवळे यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय जीरापूरे, क्षेत्र अधिकारी सुशीलकुमार शिंदे यांनी केतकी येथे जाऊन खाडीची पाहणी केली. यावेळी किनाऱ्यालगत लहान मासे समुहामध्ये अस्ताव्यस्त स्थितीत पाण्यात तडफडताना दिसले.

स्थानिकांच्या सांगण्यानुसार काही मासे मृतस्थितीत आढळून आले. मात्र, पाण्याला ओहोटी असल्याने ते वाहून गेले आहेत. भोईवाडी जेटीजवळ पाण्याचे नमुनेही घेण्यात आले.

यावेळी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, केतकी उपसरपंच रमेश जाधव, समितीचे खजिनदार विजय जाधव, नीलेश मिंडे, नितिन सैतवडेकर, मदन जाधव, कृष्णा जाधव, मुकूंद सैतवडेकर, ऋषिकेश मिंडे, महिला अध्यक्ष विशाखा सैतवडेकर, जितेंद्र जाधव, पंकज जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *